Pimpri : निवडणुकांपूर्वी मोदी मारणार मास्टरस्ट्रोक – रामदास आठवले

एमपीसी न्यूज – येणा-या लोकसभा निवडणुकांपूर्वी नरेंद्र मोदी चांगले निर्णय घेणार आहेत. सवर्ण आरक्षण हा एक मास्टरस्ट्रोक आहे. मास्टरस्ट्रोक मारण्यात नरेंद्र मोदी माहीर आहेत. ते असे आणखी काही मास्टरस्ट्रोक मारणार आहेत, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले. मोदी सरकारने आजवर मुद्रा योजना, दिवस योजना, फसल योजना, आयुष्यमान भारत योजना यांसारख्या योजनांच्या माध्यमातून चांगले निर्णय घेऊन आपले काम घराघरात पोहोचवले असल्याचेही ते म्हणाले.

चिंचवड येथे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे राज्यस्तरीय अधिवेशनासाठी ते शहरात आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. आठवले म्हणाले कि, “भारतात सर्वच सवर्ण श्रीमंत नाहीत. जे आर्थिक संकटात आहेत, त्यांना मदतीचा हात द्यायलाच हवा. तरच समानता येईल. त्यासाठी सवर्ण आरक्षण देण्यात आले आहे. हे आरक्षण देण्याची भूमिका प्रथम मी संसदेत मांडली होती. काहीजण हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणार नसल्याचे सांगतात. पण हे आरक्षण कायद्यात बदल करून देण्यात आले आहे. आरक्षण आता कायदेशीररित्या 10 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे जो कायदा आहे, त्याप्रमाणे न्यायालय देखील निर्णय घेईल. सध्या इतर मागास वर्गाला (ओबीसी) 27 टक्के आरक्षण आहे. हे आरक्षण आणखी 10 टक्क्यांनी वाढायला हवे. अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) यांचेही आरक्षण वाढविण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रव्यवहार करणार आहे.”

भाजप-शिवसेना युतीबाबत बोलताना आठवले म्हणाले, “भाजप आणि शिवसेना एकत्र येण्याची चिंता नाही. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे दोन्ही खमके नेते आहेत. पाच वर्ष जरी ते सत्तेत राहून एकमेकांच्या विरोधात बोलत असले तरी योग्य वेळी दोन्ही नेते एकत्र येतील. युती झाल्यानंतर आरपीआय मुंबई, विदर्भातील रामटेक, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या जागांवर लोकसभा निवडणूक लढणार आहे. साता-याचे उदयनराजे भोसले यांना जर राष्ट्रवादीने तिकीट नाही दिले तर त्यांना आरपीआय कडून तिकीट देऊन साता-याची देखील जागा आरपीआय लढणार आहे.”

रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी महापालिका अधिका-यांची बैठक घेतली. यावेळी महापालिकेच्या रिक्त आणि भरलेल्या पदांबाबत त्यांनी माहिती घेतली. अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आरक्षित जागांची माहिती घेतली. शहरात 71 झोपडपट्ट्या असून 34 अघोषित आणि 37 घोषित झोपडपट्ट्या आहेत. 2011 पूर्वीपासून झोपडपट्टीत राहणा-यांना घरे द्यावीत. झोपडपट्ट्यांचे विकसन करून तिथे राहणा-या नागरिकांना आवास योजनेअंतर्गत घरे द्यावीत. झोपडपट्टीत राहणा-या नागरिकांना पक्की घरे मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आठवले म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.