Pimpri: ‘भाजपच्या ‘त्या’ नगरसेविकांवर गुन्हे दाखल करा’, विरोधी पक्षनेते नाना काटे यांची मागणी

नगरसेविकांचे पद रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्याची मागणी

एमपीसी न्यूज – प्रभागात पाणी येत नाही म्हणून सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेने कासारवाडी येथे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना खोलीत डांबून ठेवल्याच्या प्रकाराला 20 दिवस झाले तरी अद्यापही गुन्हा दाखल केला नाही. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी दबावाखाली व दहशतीखाली काम करत आहेत. दोन दिवसापूर्वी सत्ताधारी भाजपच्या एका नगरसेविकेने तर आयुक्तांनाच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. त्यामुळे गैरवर्तणूक केल्याबाबत संबंधित नगरसेविकांचे पद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात काटे यांनी म्हटले आहे की, प्रभागात पाणी येत नाही म्हणून सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेने कासारवाडी येथे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना खोलीत डांबून ठेवल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वीच घडला. मागे राष्ट्रवादी कॉग्रेसने सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी पाणीपुरवठा विभागास टाळे ठोकले होते. तेव्हा राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नगरसदस्यांवर गुन्हा दाखल केला गेला होता. आता मात्र कोणताही गुन्हा दाखल केला गेला नाही. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी दबावाखाली व दहशतीखाली काम करत आहेत.

मागील दोन दिवसापूर्वी आपणांस सत्ताधारी पक्षाच्या एका नगरसेविकेने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. या घटनेनंतर आपण दोन दिवस आजारी होता, असे समजते. टक्केवारी मिळावी म्हणून थेट आपणांस शिवीगाळ केल्याचे सांगितले जात आहे. जेव्हा राष्ट्रवादी नगरसदस्यांवर गुन्हा दाखल होतो. तेव्हा त्याच कारणासाठी भाजपच्या नगसेविकेवर सुध्दा गुन्हा दाखल व्हायला हव होता. परंतु त्यावेळी आपण भाजप पक्षाला सोयीस्कर अशी भूमिका घेतली. आपल्या या दुजाभावच्या वागण्यामुळे आपणांस अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व एकेरी भाषेत उल्लेख केला गेला.

आपण त्याच वेळेस जर गुन्हा दाखल करण्यास सांगितले असते तर आज ही वेळ आपणांवर आली नसती. जेथे आपणांवर ही वेळ आली आहे तर सर्वसामान्य कर्मचारी व अधिका-यांचे काय ? या प्रकरणी आपण स्वत: पुढाकार घेऊन संबंधित नगरसेविकेवर गुन्हा दाखल करावा. गैरवर्तणूक केल्याबाबत संबंधितांचे नगरसेवकपद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवावा. यापुढे भाजप नगरसदस्यांकडून दमबाजी अथवा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर ,राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सर्व नगरसदस्य आपल्या पाठीशी आहेत.

HB_POST_END_FTR-A2
You might also like