Pimpri : महापालिकेच्या निमंत्रणपत्रिकेवर राजशिष्टाचारानुसार पालकमंत्री अजितदादांचे नाव टाका – नाना काटे

भाजपकडून राजशिष्टाचाराचा भंग

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवर राजशिष्टाचारानुसार पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव टाकणे आवश्यक होते. परंतु, सत्ताधारी भाजप पदाधिका-यांकडून मनाचा मोठेपणा दाखविला जात नाही. राजशिष्टाचार पाळला जात नाही. यापुढे राजशिष्टाचारानुसार निमंत्रण पत्रिकेवर पालकमंत्र्यांचे नाव टाकावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटने वेळोवेळी होत असतात. त्यावेळी राजशिष्टाचारानुसार जिल्हाचे पालकमंत्री, खासदार, आमदार, महापालिका पदाधिकारी, स्थानिक नगरसेवकांची नावे निमंत्रण पत्रिकेवर टाकली जातात. राज्यात महाआघाडीचे सरकार सत्तारुढ झाले आहे. परंतु, महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवर अद्याप राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हाचे पालकमंत्री अजित पवार यांचे नाव टाकण्यात येत नाही, ही खेदाची बाब आहे.

राज्यात जेव्हा भाजपचे सरकार आले तेव्हा महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना राजशिष्टाचारानुसार तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट महापालिकेच्या निमंत्रणपत्रिकेत त्यांचे नाव टाकले जात होते. परंतु, आता राज्यात सत्ता बदल झाला असताना भाजपाचे पदाधिकारी हा मोठेपणा दाखवत नाहीत. त्यामुळे आम्हाला पालकमंत्र्याचे नांव महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेत समावेश करण्याबाबत पत्र द्यावे लागते ही खेदजनक बाब आहे. यापुढे महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये राजशिष्टाचारानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे नाव टाकण्यात यावे. तसेच महापालिकेच्या विविध प्रकल्पांच्या भूमिपूजने, उद्घाटने व विविध कार्यक्रमाची निमंत्रणे पालकमंत्र्यांना पाठवावीत, अशी मागणी काटे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.