Pimpri News : पेट्रोलवरील कर राज्य सरकारने 50 टक्के कमी करावा; भाजपची मागणी

एमपीसी न्यूज – पेट्रोलवरील कर महाराष्ट्र राज्य सरकारने कमी करावा. केंद्राने कर काही प्रमाणात कमी केला आहे. त्यामुळे राज्यानेही कर कमी करण्याची भूमिका घ्यावी, यामुळे पेट्रोलचे दर कमी होतील, त्याचा जनसामान्यांना फायदा होईल. अशी मागणी भाजपकडून राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड दौ-यात पत्रकारांशी संवाद साधताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले, भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

पेट्रोलवरील कर केंद्राने कमी करावा अशी मागणी राज्याकडून केली जात होती. केंद्राने कर कमी केला. आता राज्य सरकार कधी कर कमी करणार. दर कमी करायचे राहू द्या, पण त्यावर आणखी तीन टक्के कर वाढविण्याच्या हालचाली हे सरकार करत आहे. पेट्रोलवर ठाकरे सरकार प्रतिलिटर 30 रुपये कर वसूल करत आहे. राज्य सरकारने इंपोर्टेड दारूवरील 50 टक्के कर कमी केला आहे. तसाच पेट्रोल वरील देखील कर 50 टक्के कमी करावा. अशी भारतीय जनता पक्षाची मागणी असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करत काही प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, महाराष्ट्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करण्यास नकार दिला आहे. याचवेळी सरकारने विदेशातून आयात होणाऱ्या दारुवरील उत्पादन शुल्कात तब्बल 50 टक्के कपात केली आहे. त्यामुळे आता इंपोर्टेड दारू स्वस्त होणार आहे. उत्पादन शुल्क विभागाने याबाबतची अधिसूचना काढली आहे. यानुसार, विदेशातून आयात झालेल्या स्कॉच व्हिस्कीच्या एक लिटरच्या बॉटलची किंमत 5 हजार 800 रुपये ते 14 हजार रुपयांदरम्यान असेल तर त्यावरील कर 35 ते 40 टक्के कमी होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.