Pimpri : महापालिकेचा नवीन विरोधी पक्षनेता गुरुवारी ठरणार !

अजित पवार यांची माहिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी पक्षातील अनेक सहकारी इच्छुक आहेत. येत्या गुरुवारी (दि. 18)पक्षाची आढावा बैठक होणार आहे. त्यामध्ये नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली जाईल. सगळे नगरसेवक आक्रमक आहेत. एका वर्षासाठी त्यातून एकाला संधी दिली जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसने अधिका-अधिक नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय घेतला आहे. एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पक्षाच्या अलिखित ठरलेल्या नियमानुसार विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी मंगळवारी (दि. 9) विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन विरोधी पक्षनेते कोण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

याबाबत दोन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात आले असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले, “गुरुवारी (दि.18) पक्षाचा मेळावा आहे. कार्यकर्त्यांची बैठक घेतली जाणार आहे. महापालिकेतील अनेक सहकारी विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छुक आहेत. त्यासंदर्भात गुरुवारी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली जाईल. सगळे नगरसेवक आक्रमक आहेत. एका वर्षासाठी त्यातून एकाला संधी दिली जाईल.

दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे, जावेद शेख, वैशाली घोडेकर आणि राजू मिसाळ यांच्यात विरोधी पक्षनेतेपदासाठी रस्सीखेच निर्माण झाली आहे. तसेच अजित गव्हाणे यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.