Pimpri News : पालिकेच्या नाट्यगृहांच्या शुल्कात 75 टक्के सवलत

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे जोपर्यंत प्रेक्षागृहातील प्रेक्षक संख्या 50 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे तोपर्यंत महापालिकेच्या सर्व नाट्यगृहांसाठी आकारण्यात येणा-या भाडे दरात 75 टक्के सबलत देण्यात आली आहे. त्यामुळे आता निव्वळ भाड्यापोटी वस्तूसेवा करासह दोन हजार 537 रुपये सबलतीचा दर आकारण्याचा निर्णय आज (बुधवारी, दि. 16) स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील सर्व चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 14 मार्च 2020 पासून बंद करण्यात आली. त्यानंतर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कंटेन्मेंट झोनच्या बाहेर 5 नोव्हेंबर पासून सिनेमागृह आणि प्रेक्षागृह त्यांच्या एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षक क्षमतेसह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

कोरोना काळामध्ये जोपर्यंत प्रेक्षागृहातील प्रेक्षक संख्या 50टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे तोपर्यंत नाट्यगृहांच्या भाडेदरात सवलत देण्याची मागणी नाट्य व सांस्कृतिक व्यवस्थापक संघाने केली होती.

स्थायी समितीसमोर सवलतीच्या दराबाबतचा विषय मंजूरीसाठी ठेवण्यात आला होता. स्थायी समितीने सर्व नाट्यगृहांसाठी 75 टक्के सवलतीचे भाडेदर आकारण्याच्या या विषयाला मंजूरी दिली.

कोरोना काळामध्ये प्रेक्षागृहाची प्रेक्षक संख्या 50 टक्के मर्यादित ठेवण्यात आली आहे तोपर्यंत अथवा कोरोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत महापालिकेच्या भाडेदर दोन हजार 537 रुपये आकारण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.