Pimpri News : ऑक्सिजनचा तुडवडा भरुन काढण्यासाठी छोटे ऑक्सिजन प्लांट हाच उपाय : अशोक मंगल

एमपीसी न्यूज – भारतात ठिकठिकाणी अनेक छोटे- छोटे ऑक्सिजन निर्मिती प्लांट होते. यातून निर्मिती होणारा ऑक्सिजन वैद्यकीय आणि उद्योगाची गरज भागवत होता. त्यानंतर मोठ्या क्षमतेचे प्लांट उभारले जाऊ लागले आणि छोटे प्लांट गायब झाले. यामुळे मोजक्या धनिकांच्या हाती देशातील ऑक्सिजन निर्मिती गेली आणि वाहतूक करुन ऑक्सिजन पोहचवणे अवघड झाले. सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी प्रभावीपणे लढण्यासाठी शहरात पुन्हा असे छोटे प्लांट उभारले पाहिजेत, असे मत वायु निर्मिती उद्योग क्षेत्राचा 44 वर्षाचा अनुभव असणारे उद्योजक अशोक मंगल यांनी व्यक्त केले.

अशोक मंगल यांनी देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऑक्सिजनचा तुटवडा, सरकारी धोरण आणि यासाठी पर्यायी उपाययोजना यावर आपले मत व्यक्त केले. मंगल म्हणाले, ‘देशात ऑक्सिजन निर्मितीचे मोजके प्लांट शिल्लक राहिल्याने सगळा ऑक्सिजन एका ठिकाणी साठवला जात आहे.

ऑक्सिजनची वाहतूक ही मुख्य समस्या असून, रुग्णांपर्यंत वेळेत ऑक्सिजन न पोहोचल्याने त्यांचा जीव जात आहे. दहा पंधरा वर्षांपूर्वी आपल्याकडे छोटे प्लांट मोठ्या प्रमाणावर होते पण, मोठ्या प्लांटच्या निर्मितीमुळे ठराविक लोकांकडे ऑक्सिजन उत्पादन गेले. पर्यायी सर्व ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा करणं अवघड होत आहे.’

सरकार उभारत असलेल्या ‘पीएसए’ प्लांट बाबत बोलताना मंगल म्हणाले, सरकार ऑक्सिजन तुटवडा भरुन काढण्यासाठी ‘पीएसए’ प्लांट उभारत आहे. यासाठी भरघोस निधी पुरवला जात आहे. पण, ‘पीएसए’ प्लांटमधून निर्माण होणारा ऑक्सिजन हा 93 टक्के शुद्ध असतो. त्यामध्ये 7 ते 8 टक्के अशुद्धता असते. त्यामुळे हा ऑक्सिजन आयसीयु, ऑपरेशन थिएटरमधील रुग्णांना दिला जाऊ शकत नाही, असे तज्ञ डॉक्टर सांगतात. त्यामुळे या ऑक्सिजनची ही एक मुख्य समस्या आहे.

दुसरं म्हणजे ‘पीएसए’ प्लांटमधून निर्माण होणारा ऑक्सिजन सिलिंडरमध्ये भरला जात नाही. त्यामुळे त्यावर बॅजेस लागत नाहीत तसेच पुढे त्यांच परिक्षण केले जात नाही. अशुद्धतेची तपासणी होत नसल्याने आपण रुग्णांचे आरोग्य धोक्यात टाकत असल्याचे मंगल यांनी नमूद केले.

‘पीएसए’ प्लांट उभारुन ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या काही नामांकित संस्था आहेत. प्लांट चालक ‘पीएसए’मधून निर्माण होणारा ऑक्सिजन मोठ्या व्हेंटिलेटरमध्ये भरण्यायोग्य नसल्याचे सांगतात. मात्र, त्यांच्याकडून छापल्या जाणा-या पत्रकावर आयसीयु मध्ये या ऑक्सिजनचा वापर होऊ शकतो, असे म्हटले जात असून, ही दिशाभूल असल्याचे मंगल यांनी नमूद केले.

इंडियन फार्माकोपीया, एफडीए यांनी घालून दिलेल्या नियमावलीचे पालन होत नाही. तज्ज्ञांमार्फत याची चाचणी होत नाही. याशिवाय ऑक्सिजन सिलिंडरमध्ये भरला देखील जात नाही. त्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात घातला जात असून इतरांची दिशाभूल होत असल्याचे मंगल म्हणाले.

ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी पुन्हा शहरांमध्ये पूर्वीसारखे छोटे प्लांट उभारावे लागतील असे मंगल यांनी सुचविले.

या विषयी मंगल म्हणाले, छोटे प्लांट उभारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रत्येकी 20 टक्के, तसेच स्थानिक प्रशासनाने 20 टक्के अनुदान द्यावे. उरलेले 40 टक्क्यांतील 20 टक्के हॉस्पिटल आणि 20 टक्के उद्योजकांनी गुंतवणूक करावी अशी सूचना त्यांनी केली.

यामधून निर्माण होणा-या ऑक्सिजन पैकी पन्नास टक्के रुग्णालय आणि उरलेले पन्नास टक्के उद्योगांना द्यावे. आवश्यकतेनुसार रुग्णालयांचा ऑक्सिजन पुरवठा वाढवला जाऊ शकतो, असेही मंगल म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.