Pune News : दीड वर्षात राज्य सरकारने बारा बलुतेदारांना, लोक कलावंताना काहीही मदत केली नाही – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – कोरोनाची पहिली लाट ओसरुन दुसरी आली, आता तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. यामध्ये गेल्या दीड वर्षापासून आम्ही राज्य सरकारकडे सातत्याने मागणी करत आहोत की, हातावर पोट असणाऱ्या असंघटित कामगारांपैकी बारा बलुतेदारांना मदत करा. पण गेल्या दीड वर्षात एक रुपयाही मदत राज्य सरकारने केली नाही, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

मुकुल माधव फाउंडेशन व क्रिएटिव्ह फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज पाटील यांच्या हस्ते लोक कलावंताना एक महिना पुरेल इतका शिधावाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, मुकुल माधव फाउंडेशनचे जितेंद्र जाधव, योगेश रोकडे,नगरसेविका आणि शिक्षण मंडळ अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर, पुणे शहर चिटणीस प्रशांत हरसुले, कोथरूड मंडलाचे अध्यक्ष पुनित जोशी, महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षदा फरांदे, स्वीकृत सदस्य ऍड. मिताली सावळेकर, रामदास गावडे,जयश्री तलेसरा, अमोल डांगे, अपर्णा लोणारे, माणिक दीक्षित, आय टी सेलच्या शहर संयोजिका कल्याणी खर्डेकर, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रतीक खर्डेकर यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, कोरोनाचा सर्वाधिक फटका असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या बारा बलुतेदारांना बसला. या वर्गाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी गेल्या दीड वर्षापासून आम्ही सातत्याने राज्य सरकारकडे मागणी करत आहे. पण त्यांना काहीही मदत राज्य सरकारने केली नाही. राज्यात मुख्यमंत्री दुसरा लॉकडाऊन लागू करत होते, तेव्हाही आमची या वर्गासाठी आर्थिक पॅकेज देण्याची मागणी केली होती. पण सरकारने काय दिलं. राजा उदार झाल्या प्रमाणे फक्त १५०० रुपयाची मदत केली. एवढ्या मदतीत एखाद्या कुटुंब तरी कसे चालेल असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की, कोरोनाचे संकट अजून किती काळ चालेल, हे कुणालाच माहीत नाही. मात्र याचा सामना करताना आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला नेहमी तत्पर राहिलं पाहिजे. अशी सूचना ही त्यांनी यावेळी केली.

चंद्रकांत पाटील यांचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्य सर्वज्ञात आहे, मात्र कोथरूड चे आमदार म्हणून किंवा पुणे शहरातून निवडून आल्यामुळे गत वर्षभर शहरात केलेले सेवाकार्य दुर्लक्षित करून चालणार नाही असे संदीप खर्डेकर म्हणाले. चंद्रकांत पाटील यांच्या कार्यापासुन प्रेरणा घेऊन समाजातील उपेक्षित घटकांना मदत करण्याचा निर्धार क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुल माधव फाउंडेशन ने केला असून त्यालाच अनुसरून आज लोक कलावंताना मदत करत आहोत.

यात वाघ्या-मुरळी, पोतराज, लोकगीतकार, लोकगायक यांचा समावेश आहे. वर्षभर आपले दुःख लपवत चेहरा रंगवून जनतेचे मनोरंजन करणाऱ्या कलावंताना मदतीचा हात देताना कर्तव्यपूर्ती चे समाधान लाभत असल्याचे ही संदीप खर्डेकर म्हणाले. *सुया घे,पोत घे या गाण्यासह गुगलबाई ही सुपरहिट गाण्याचे सर्जक प्रदीप कांबळे असोत किंवा शांताबाई फेम संजय लोंढे असोत किंवा लय मजबूत भीमाचा किल्ला या गाण्याचे गीतकार संगीतकार गायक सचिन येवले, शैलेश येवले याच बरोबर लय वाढीव दिसतंय राव किंवा खिशात असतील मनी तर मागे लागतील सतरा जणी चे संगीतकार सचिन अवघडे यासह सर्वच कलावंत अडचणीत असल्याचे ही ते म्हणाले.

या कार्यक्रमावेळी लोक कलावंत प्रदीप कांबळे यांनी आपली व्यथा मांडली. गेल्या दीड वर्षापासून एक ही कार्यक्रम न झाल्याने एक रुपयाची कमाई झाली नाही. त्यातच कोरोनामुळे आर्थिक खर्चाचा भार देखील पडला‌. राज्य सरकारकडून अद्याप काहीही मदत झाली नाही. त्यामुळे शासन दरबारी आम्हा लोक कलावंतांची व्यथा मांडून, आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती त्यांनी यावेळी साश्रूनयनांनी केली.

या कार्यक्रमाचे संयोजन व प्रास्ताविक क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केले, मंजुश्री खर्डेकर यांनी आभार मानले, तर मुकुल माधव फाऊंडेशनचे जितेंद्र जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.