Pimpri News : भारत बंद; पिंपरी-चिंचवड शहरात संमिश्र प्रतिसाद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

एमपीसी न्यूज – पंजाब आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यातील बदलाच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. आज (मंगळवारी) आंदोलकांनी भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनाला पिंपरी-चिंचवड शहरात संमिश्र प्रतिसाद असून काही दुकाने बंद तर काही दुकाने सुरु झाली आहेत. दरम्यान पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

कृषी कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला देशभरातील अनेक पक्ष आणि शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी देखील या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात देखील हा बंद पाळण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील विविध पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

पंजाब आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यातील बदलाबाबत आक्षेप घेत आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचे पडसाद देशभर ठिकठिकाणी उमटत आहेत. त्यात मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी दिवसभर काही पदाधिकारी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात धरणे आणि अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. दरम्यान सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवणार आहेत.

सध्या सुरु असलेल्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील विविध पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या. एका ठिकाणी जास्त लोकांनी जमू नये. कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याकडे लक्ष ठेवणे. प्रातिनिधिक स्वरुपात कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करावे. अशा सूचना पोलिसांनी केल्या आहेत.

पिंपरी मार्केट मधील फुलांची दुकाने सकाळी नऊ वाजता उघडली. तर अन्य दुकाने बंद होती. शहरात इतर ठिकाणी काही दुकाने बंद ठेऊन दुकानदारांनी या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे चौकात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.