Pimpri News: भाजप हटाव पिंपरी-चिंचवड बचाव, स्थायी समिती अध्यक्ष राजीनामा द्या; शिवसेनेचे आंदोलन

एमपीसी न्यूज – ”गली गली मे शोर है, भाजपा चोर है”,” ”बरखास्त करा, स्थायी समिती बरखास्त करा”, ”ना लाज ना, शिष्टाचार, खुलेआम करेंगे भ्रष्टाचार”, ”चाटून खा, पुसून खा, भाजपा”, ”दरोडेखोर भाजपा”, ”भ्रष्टाचारी अध्यक्षाचा धिक्कार असो”, ”भाजपा चले जावं”, ”भाजप हटाव, पिंपरी-चिंचवड बचाव”, ”दादागिरी, टक्केवारी नही चलेगी”, ”स्थायी समिती अध्यक्ष राजीनामा द्या”, अशा जोरदार घोषणा देत शिवसेनेने आज (बुधवारी) महापालिका दणाणून सोडली.

चालखोरी प्रकरणानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज आयोजित केली होती. यापार्श्वभूमीवर शहर शिवसेनेच्या वतीने महापालिका मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावरील स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनासमोर हातावर काळ्या फिती बांधून आंदोलन केले. सभा सुरु होण्याच्या वेळेस दुपारी अडीच वाजता शिवसैनिकांनी आंदोलन सुरु केले. माजी आमदार गौतम चाबुकस्वार, सहसंपर्क प्रमुख योगेश बाबर, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, सचिन सानप, नाना काळभोर यांच्यासह आदी शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते. ”स्थायी समिती अध्यक्ष राजीनामा द्या”, ”सामान्य जनतेच्या पैशांतून चाललेली लूटमार बंद करा” असा मजकूर असलेले फलक आंदोलकांनी हातामध्ये घेतले होते.

माजी आमदार गौतम चाबुकस्वार म्हणाले, ”एसीबीने कारवाई करत स्थायी समिती अध्यक्ष, कर्मचाऱ्यांना अटक केली. त्यांना पोलीस कोठडीही मिळाली. कर्मचाऱ्यांना निलंबित केले. याप्रकरणी नैतिक जबाबदारी घेऊन अध्यक्षांनी राजीनामा देणे अपेक्षित होते. पण, त्यांनी राजीनामा दिला नाही. स्थायी समितीच्या भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या सर्वांची सखोल चौकशी व्हावी. पाकिटावर 16 सदस्यांची नावे असल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यांचीही चौकशी व्हावी. या मागणीसाठी आम्ही आंदोलन केले”.

सहसंपर्क प्रमुख योगेश बाबर म्हणाले, ”आठ दिवसांपूर्वी एसीबीने धाड टाकून स्थायी समिती अध्यक्षांना रंगेहाथ पकडले. यामुळे त्यांनी नैतिकदृष्या राजीनामा देणे आवश्यक होते. परंतु, महापालिकेचा कारभार पाहणाऱ्या आमदारांनी त्यांची बाजू घेतली. भाजपच्या राजवटीत शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झाला. भाजप पदाधिकारी, ठेकेदारांनी रिंग करुन टेंडरच्या रकमा वाढवून महापालिकेला लुटले. पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या भाजपने स्थायी समिती अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पिंपरीतील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठववा. चौकशीची मागणी करावी”, अशी शिवसेनेची मागणी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.