Pimpri News : भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

एमपीसी न्यूज – मराठवाडा जन संघाचे अध्यक्ष अरुण पवार, भाजप सह्याद्री आदिवासी मंडळाचे विष्णू शेळके, मोशीतील भाजपचे युवक कार्यकर्ता ज्ञानेश्र्वर बोऱ्हाडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

मुंबई येथील महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात गुरुवारी (दि. 23) हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, पक्षाचे शहर मुख्य संघटक अरुण बोऱ्हाडे यांच्यासह पदाधिकारी व‌ कार्यकर्ते उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे स्वागत केले. तसेच, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये एकजुटीने पक्ष संघटन वाढविण्यासाठी काम करण्याच्या सूचना केल्या. पक्ष प्रवेश घेतलेल्या नेते, कार्यकर्त्यांनी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळवून देण्यासाठी झोकून देऊन काम करण्याचा विश्वास त्यांनी अजित पवार यांना दिला.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेशांची मालिका सुरु झाली आहे. बुधवारी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेले गजानन चिंचवडे यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. गुरुवारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.