Pimpri news: वजन वाढविण्यासाठी खासगी जागेतील कचरा भरणाऱ्या ‘एजी इनव्हायरो’ला काळ्या यादीत टाका – नामदेव ढाके

एमपीसी न्यूज – कच-याचे वजन वाढविण्यासाठी खासगी जागेतील कचरा गाडीत भरणाऱ्या एजी इनव्हायरो एजन्सीला काळ्या यादीत टाकावे. तसेच ठेकेदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे. त्यात ढाके यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपो येथे टाकण्यासाठी एजी इनव्हायरो या कंपनीला ठेकेदार पध्दतीने काम देण्यात आले आहे. टनानुसार या ठेकेदार कंपनीस कचरा उचलण्याच्या कामाची बीले महापालिकेकडून अदा केली जातात.

असे असताना रविवारी या कंपनीचे कर्मचारी कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी वाकड, कस्पटेवस्ती या ठिकाणी हॉटेल व वाईन शॉप आवारातील खासगी कचरा उचलत असल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणावरुन या ठेकेदाराने कामाच्या अटी/शर्तींचा भंग करुन महापालिकेचे आर्थिक नुकसान करत असल्याचे तसेच अशाप्रकारे जादा वजन वाढवून त्याची बीले महापालिकेस देवुन महापालिकेकडून पैसे उकळण्याचा प्रकार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

या ठेकेदाराने दरमहाच्या बिलानुसार अशाच पद्धतीने राडा-रोडा, जमिनीवरील माती, दगड-धोंडे टाकून वजन वाढवुन बिले घेतली असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही. ही बाब गंभीर स्वरुपाची असून या ठेकेदारावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. मागील बीलांची तपासणी करुन कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता एजी इनव्हायरो या ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकावे. ठेकेदार व त्याच्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे ढाके यांनी म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.