Pimpri News : राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा- बाळासाहेब दाते

एमपीसी न्यूज – कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात. तसेच विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन पास करावे, अशी मागणी सुजाण नागरिक मंचाकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन मंचाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना मेलद्वारे पाठवण्यात आले आहे.

केंद्र सरकार, युजीसी, राज्यपाल, राज्याचे उच्च शिक्षण मंत्री, सर्व विद्यापीठांचे कुलगुरू अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी आग्रही आहेत. मात्र, राज्यासह देशभरात कोरोनाचा कहर सुरु आहे. घराबाहेर पडणे म्हणजे कोरोनाला बळी पडणे असे संकट सुरु आहे. राज्य शासनाने काही परीक्षा रद्द केल्या आहेत. परीक्षा आज ना उद्या घेता येतील, पण त्यासाठी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालणे योग्य नाही.

भारतात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. भारत जगाच्या क्रमवारीत तिस-या स्थानावर पोहोचला आहे. ही बाब चिंताजनक आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन तसेच ज्यादाचे दहा टक्के गुण देऊन पास करावे, असेही सुजाण नागरिक मंचातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मंचाचे अध्यक्ष बाळासाहेब दाते म्हणाले, “कोरोनाची साथ सुरु आहे. त्यात डेंग्यू, मलेरिया, सर्दी, ताप, न्युमोनिया यांसारखे आजार देखील डोके वर काढत आहेत. परीक्षांसाठी विद्यार्थी बाहेर पडले तर आणखी कोरोनाचा उद्रेक होईल. ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी ग्रामीण भागात अजूनही नेटवर्कची बोंब आहे. त्यामुळे सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात. अन्यथा सुजाण नागरिक मंचातर्फे जनांदोलन करण्यात येईल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.