Pimpri News: सॉफ्टवेअरमध्ये बदल! नागरिकांना शास्तीकर वगळून मूळ कर भरता येणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने सॉफ्टवेअरमध्ये बदल केला आहे. त्यामुळे नागरिकांना अवैध बांधकाम शास्ती वगळून मूळ मालमत्ता कर भरता येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन मालमत्ताकराचा तत्काळ भरणा करावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले.  शास्तीकराशिवाय मूळ कर स्वीकारला जात नसल्याने 330 कोटी मूळ मालमत्ता कर थकला असल्याचेही त्यांनी सांगितले.

महापालिकेच्या कर संकलन विभागामार्फत शहरातील इमारती व जमिनींवर मालमत्ता कराची आकारणी करण्यात येते. सध्या 5 लाख 69 हजार 645 मालमत्तांची नोंद आहे. चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 2 लाख 78 हजार 315 मालमत्ताधारकांकडून 415 कोटी 6 लाख रुपये मालमत्ता कराची वसुली झाली आहे. मागीलवर्षी आजमितीला 440 कोटींची वसुली झाली होती. यंदा 30 कोटी कमी वसूल झाले आहे. शास्तीकराशिवाय मूळ कर स्वीकारला जात नसल्याने वसुली कमी झाली आहे.  अवैध बांधकाम शास्तीमुळे 723 कोटी रुपये थकले आहेत. त्यात 330 कोटी मूळ तर 328 कोटी शास्तीची रक्कम आहे. विभागाला 950 कोटी रुपयांचे उदिष्ट असून पुढील 25 दिवसात 200 कोटी रुपये कर वसूल होईल असे देशमुख यांनी सांगितले.

विभागामार्फत कर वसुलीची मोहिम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. थकबाकीदारांना घरभेटी देणे, वसुलीसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणा-या मोठ्या थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीस बजाविण्याची कार्यवाही सुरु आहे. आतापर्यंत 18 हजार 541 थकबाकीदारांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. नोटिसीच्या मुदतीत थकबाकी न भरल्यास मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. 6 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. चेक बाऊंस झालेल्या 124 मालमत्ताधारकांना नोटीसा बजाविण्यात येत असून रक्कन न भरणा-या मालमत्ताधारकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.