Pimpri news: महापालिका प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी करणाऱ्या पाच जणांविरोधात पोलिसांत तक्रार

एमपीसी न्यूज – कोविड 19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात संचार बंदी आदेश लागू आहे. अशा काळात महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनाच्या प्रवेशव्दारा समोर गर्दी जमवून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करणा-या राजू सुदाम भालेराव आणि इतर पाच जणांविरुद्ध महापालिकेच्या वतीने पिंपरी ठाण्यात तक्रार दिली आहे.

भारतीय दंड संहिता कलम 188 व 269 अन्वये तसेच साथीचे रोग अधिनियम 1897 अन्वये कलम 3 नुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.

शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी पराग एकनाथ मुंडे (वय 57, रा. देवत निवास, पुरंदर कॉलनी, काळेवाडी, रहाटणी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यात म्हटले आहे की, मी महापालिकेमध्ये सहाय्यक प्रशासन अधिकारी म्हणून नेमणुकीस आहे. आज मी माझ्या ऑफीसमध्ये काम करीत असताना दुपारी साडे बाराच्या सुमारास सुरक्षा अधिकारी उदय जरांडे यांनी त्यांचा एक सुरक्षा कर्मचा-याला महापालिकेच्या मुख्य प्रवेशव्दार येथे बोलविण्यासाठी माझ्याकडे पाठविला.

म्हणून मी मुख्य प्रवेशव्दार येथे गेलो असता तेथे आमच्याकडे माहिती अधिकाराखाली माहिती मागितलेले राजू सुदाम भालेराव (वय 45 वर्षे स.जनता फुटवेअर मागे, बलदेवनगर, पिंपरी, पुणे) व त्याचे बरोबर 5 इसम तेथे येऊन घोषणाबाजी करीत होते.

सध्या कोरोना संसर्गाची साथ पसरत असताना, तसेच प्रशासनाने लॉकडाउन जाहिर केले असताना आपले कृत्यामुळे कोरोना संसर्ग पसरून लोकांच्या जीवीतास धोका निर्माण होऊ शकतो हे माहित असताना देखील राजू भालेराव यांनी महापालिका मुख्य प्रवेशव्दारासमोर त्याचे बरोबर इतर 5 लोकांना एकत्र जमवून घोषणाबाजी केली.

तसेच प्रशासनाचे आदेशाचा अवमान केला म्हणून राजु भालेराव व त्यांचे साथीदार यांचे विरुद्ध भा.द.वि. कलम 188, 269 प्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 (ब) साथरोग अधिनियम 1890 चे कलम 3 प्रमाणे सरकार तर्फ फिर्याद दिली आहे.

पुढील तपास पिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मिलिंद वाघमारे करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.