Pimpri News: कोरोनामुळे ब्रॅण्डेड, जेनेरिक औषधे खरेदीसाठी वाढीव खर्च

चार महिन्यात तीन कोटींचा वाढीव खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व दवाखाने, रूग्णालयांसाठी आवश्यक असणारी ब्रॅण्डेड औषधे, जेनेरिक औषधे आणि सर्जिकल साहित्य तीन पुरवठादारांकडून खरेदी करण्यात येतात. यासाठी दोन वर्षे कालावधीकरिता एक कोटी रूपये खर्च अपेक्षित असताना कोरोना महामारीच्या संकटामुळे चार महिन्यात औषधे, साहित्य खरेदीवर तब्बल तीन कोटी वाढीव खर्च झाला आहे. तीन पुरवठादारांना हा खर्च देण्यात येणार आहे.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयासह सर्व दवाखाने, रूग्णालयांसाठी आवश्यक असणारी औषधे, साहित्य पुरवठा मध्यवर्ती औषध भांडार विभागामार्फत करण्यात येतो. तथापि, अपवादात्मक परिस्थितीत रूग्णांसाठी आवश्यक औषधे किंवा साहित्याचा पुरवठा मध्यवर्ती औषध भांडाराकडून होत नाही.

त्यामुळे वायसीएम रूग्णालयातील औषध भांडारात शिल्लक नसणारी तसेच मध्यवर्ती औषध भांडाराकडील निविदेत समाविष्ट नसणारी औषधांची खरेदी वायसीएम रूग्णालयामार्फत निश्चित केलेल्या स्थानिक एजन्सीकडून निविदा प्रक्रीया राबवून खरेदी केली जातात.

त्यामध्ये ब्रॅण्डेड औषधे, जेनेरिक औषधे, सर्जिकल साहित्य खरेदी केले जाते. 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीसाठी ओमनी हेल्थकेअर सिटीकेअर फार्मसी यांच्यामार्फत बॅरण्डेड औषधांच्या किमतीवर 15.50 टक्के सुट, कोठारी मेडीकल यांच्यामार्फत जेनेरिक औषधांच्या किमतीवर 56.70 टक्के सुट आणि रूबी अलकेअर सर्व्हिसेस यांच्यामार्फत सर्जिकल साहित्याच्या किमतीवर 54 टक्के सुट या दराने या तीन एजन्सीज निश्चित करण्यात आल्या आहेत.

रूग्णालयांकरिता तातडीने आवश्यक औषधे, साहित्य खरेदीकरिता, तातडीक सेवा विचारात घेता औषधांची उपलब्धता आणि वेळेवर रूग्णोपचार होण्यासाठी एका बाबींकरिता एका पुरवठाधारकावरच अवलंबून न राहता एकापेक्षा जास्त पुरवठाधारक असावेत, या हेतूने या तीनही पुरवठादारांकडून औषधे, साहित्य खरेदी करण्यात येतात. या निविदेचा कालावधी दोन वर्षाकरिता असून त्यासाठी अंदाजे एक कोटी रूपये खर्च अपेक्षित होता.

परंतु, कोरोना संकटामुळे महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयासह इतर रूग्णालयांअंतर्गत विलीनीकरण कक्ष सुरू करण्यात आले. आयसीयू आणि इतर वॉर्डमध्ये दाखल रूग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक औषधे, साहित्याची मागणी मध्यवर्ती भांडार विभागाकडे वेळावेळी करण्यात येत होती. मात्र, या निविदा प्रक्रीयेत कोरोनाकरिता आवश्यक औषधे, साहित्य यांची खरेदी समाविष्ट नव्हती.

त्यातच लॉकडाऊनमुळे मध्यवर्ती भांडाराकडील पुरवठाधारकांकडून औषधे, साहित्याचा मागणीनुसार पुरेशा प्रमाणात पुरवठा होत नव्हता. त्यामुळे रूग्णसेवेत अडथळा ठरू नये, याकरिता कोरोना रूग्णांवर उपचारासाठी एप्रिल 2020 पासून तातडीक औषधे, साहित्य खरेदी नेमणूक केलेल्या या तीन पुरवठाधारकांकडून उपलब्ध करून घेतली जात आहे.

1 सप्टेंबर पासून महापालिकेतर्फे ऑटोक्लस्टर आणि अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलात जम्बो रूग्णालय सुरू करण्यात आले. या रूग्णालयांसाठीही तीन पुरवठाधारकांकडून औषधे, साहित्य उपलब्ध करून घेण्यात येत आहे. या निविदेसाठी दोन वर्षाकरिता अंदाजे एक कोटी रूपये खर्च अपेक्षित असल्याने जुलै 2020 पर्यंतच्या बीलापोटी त्यांना 99 लाख 43 हजार रूपये देण्यात आले आहेत.

ऑगस्ट ते नोव्हेंबर 2020 या कालावधीपर्यंत कोठारी मेडीकल यांना अंदाजे 1 कोटी 23 लाख 69 हजार रूपये, रूबी अलकेअर सर्व्हीसेस यांना 74 लाख 75 हजार रूपये आणि ओमनी हेल्थकेअर यांना 1 कोटी 10 लाख रूपये असे एकूण 3 कोटी 8 लाख 44 हजार रूपये बिलाची पूर्तता करणे बाकी आहे. या निविदेची मुदत 31 मार्च 2020 पर्यंत असल्याने 3 कोटी 50 लाख रूपये इतकी वाढ अपेक्षित ठेवण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.