Pimpri News: कोरोना मृत्यांच्या नातेवाईकांचे अर्थिक मदतीचे  640 अर्ज नामंजूर; कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचा दावा  

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये तब्बल तीन लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली. या कालावधी अनेक नागगरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला. घरातील कर्त्या माणसाचा मृत्यू झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. त्यांना सावरण्यासाठी मदत व्हावी यासाठी राज्य सरकारच्या वतीने 50 हजार रुपयांची अर्थिक मदत घोषित करण्यात आली. मात्र, पिंपरी चिंचवड महापालिकेकडे याबाबतच्या आलेल्या अर्जांपैकी 640 अर्ज बाद झाले असल्याचे समोर आले आहे. कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचा दावा प्रशासनाने केला.

कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या निकटतम नातेवाईकांस 50 हजार रुपये इतका सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्याबाबतचे अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया डिसेंबर महिन्यापासून सुरू झाली. मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बॅंक खात्यात जमा करण्याकरिता ही योजना तयार केली आहे. त्यानुसार मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी राज्य शासनाने विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करायचे होते. पिंपरी-चिंचवड महापालिका अंतर्गत यासाठी 6 हजार 59 मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी अर्ज केले होते. त्यापैकी 640 जणांचे अर्ज बाद झाले असल्याचे समोर आले आहे.

नातेवाईकांना अर्थिक मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने मोठ्या जाचक अटी ठेवल्या नव्हत्या. मात्र तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज बाद झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू हा रुग्णालयात अथवा रुग्णालयाच्या बाहेर झाला असला. तरी ही मदत देण्यात येणार आहे. तसेच कोरोनाचे निदान झाल्यानंतर एखाद्या व्यक्तिने आत्महत्या केली असली तरी मदत केली जाणार आहे. मात्र अर्ज करत असताना कागदपत्रांमध्ये झालेली चूक व आधार कार्ड नंबर चुकल्याने अर्ज बाद झाले असल्याची शक्‍यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हा अर्ज दाखल करताना अर्जदाराने स्वतःचा तपशील, आधार क्रमांक, अर्जदाराचा स्वतःच बॅंक तपशील, मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, मृत्यू प्रमाणपत्र व इतर नातेवाईकाचे नाहरकत असल्याचे स्वंय घोषणापत्र देणे बंधनकारक होते. यावरून मृत पावलेल्या व्यक्तीचा आधार तपशील सार्वजनिक आरोग्य विभागाकडे कोरोनाने मृत्यू पावलेल्या डेटा उपलब्ध असलेल्या आधार क्रमांकाशी जुळवला जातो. आधार क्रमांक जुळल्यास हा अर्ज संगणकीय प्रणालीवर आपोआप स्वीकृत करण्याची कार्यवाही करण्यात येते. मात्र तसे झाले नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडे हे अर्ज संगणकीय प्रमाणपत्रावर पाठविण्यात येतात.

वेब पोर्टलवर केलेले ऑनलाईन अर्ज बाद झाले तरी त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी एक संधी देण्यात येणार आहे. ज्यांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यांचे अर्ज महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संगणकीय प्रणालीवर पाठविण्यात येतात. या अर्जांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याला एडिट म्हणजेच संपादन करण्याचे अधिकार राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे चुकलेल्या अर्जांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी एक संधी भेटणार आहे.

याबाबत वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, महापालिका व ग्रामीण भागातून 6059 अर्ज करण्यात आले आहेत. त्यापैकी 640 अर्ज बाद झाले आहेत. ज्यांचे अर्ज बाद झाले आहेत, त्यांना प्रत्यक्ष एक तारीख देऊन बोलवण्यात येणार आहे. त्यासाठी पाच जणांची कमिटी स्थापन करण्यात येईल. एकही नातेवाईक यापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.