Pimpri News : शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेल्या गजानन चिंचवडे यांचे आकस्मिक निधन

एमपीसी न्यूज – शिवसेनेतून काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या गजानन चिंचवडे यांचे आज (शनिवारी) आकस्मिक निधन झाले. त्यांचे वय 52 होते. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांचे ते पती होत.

गजाजन चिंचवडे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसकडून तत्कालीन पीसीएमटीचे ते पाच वर्षे सदस्य होते. महापालिका शिक्षण मंडळावरही ते पाच वर्षे सदस्य होते. शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी काम केले. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचे विश्वासू सहकारी अशी गजाजन चिंचवडे यांची ओळख होती. संघवी केजरी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता.

काही महिन्यांपूर्वी चिंचवडे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित चिंचवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या पत्नी अश्विनी चिंचवडे शिवसेनेकडून सलग दोनवेळा नगरसेविका आहेत.

गजाजन चिंचवडे मित्राच्या सदनिकेवर गेले होते. तिथे बाथरूममध्ये पडलेल्या अवस्थेत ते आढळले.  त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.