Pimpri news: शहरातील 33.9 टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेला, सुमारे साडे आठ लाख नागरिकांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज!

सार्स - कोवी 2 सर्वेक्षणाचा निष्कर्ष

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 33.9 टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेला आहे. सुमारे साडे आठ लाख नागरिकांमध्ये अँटिबॉडीज (प्रतिपिंड) विकसित झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी हे नागरिक सक्षम आहेत. झोपडपट्टी भागातील सर्वाधिक म्हणजेच 37.8 टक्के लोकांना कोरोना होऊन गेल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

याबाबतची माहिती महापौर उषा ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, सभागृह नेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, कोविड तांत्रिक समिती सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, डॉ. डी. वाय. पाटील मेडीकल कॉलेजचे डॉ. अमित बॅनर्जी, डॉ. भार्गव गायकवाड, डॉ. अतुल देसले उपस्थित होते.

आयुक्त हर्डीकर म्हणाले, पिंपरी – चिंचवड महापालिका आणि डॉ. डी. वाय. पाटील मेडीकल कॉलेज अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर यांच्यावतीने केलेल्या अ‍ॅण्टीबॉडीज चाचणी म्हणजेच ‘सार्स कोवी – 2 सर्वेक्षण’तून ही निरीक्षणे समोर आली आहेत. 7 ते 17 ऑक्टोबर 2020 दरम्यान 10 पथकाच्या माध्यमातून हा सर्व्हे करण्यात आला.

5 हजार व्यक्तींच्या रक्त नमुन्यांची शास्त्रीय तपासणी करण्यात आली. त्यासाठी शहरात 200 क्लस्टर निर्माण करण्यात आले होते. झोपडपट्या, गावठाण, बैठी घरे, गृहनिर्माण संस्था यांचा यात समावेश होता. प्रत्येक विभागातून असे एकूण 5 हजार नमुने तपासण्यात आले.

झोपडपट्टीमधील 37.8 टक्के लोकांना कोरोना होऊन गेला. गावठाण, बैठी घरे, चाळीतील 38.3 टक्के आणि हाऊसिंग सोसायटीतील 27.7 टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेला. 33.8 टक्के महिलांमध्ये तर 28.9 टक्के पुरुषांमध्ये अँटीबॉडीज आढळून आले आहेत. पुरुषांपेक्षा महिलांमधील अँटीबॉडी अधीक विकसित असल्याचे दिसून आले.

51 ते 65 वयोगटातील नागरिकांमध्ये जास्त प्रमाणात अँटीबॉडी आढळून आल्या असून त्याचा दर 35.5 टक्के इतका आहे. किशोरवयीन 12 ते 18 वर्षांच्या मुला मुलींमध्ये 34.9 टक्के, 29 ते 30 वयोगटामध्ये 29.7 टक्के, 35 ते 50 वयोगटातील लोकांमध्ये 31.2 टक्के तर 66 वर्षांपुढील नागरिकांमध्ये 28.2 टक्के अँटीबॉडी आढळल्या आहेत.

पिंपळेनिलख गावठाण, बोपखेल, पत्रीचाळ, पवनानगर या भागात 65 टक्के लोक पॉझिटिव्ह आढळले. तर, काही भागात फक्त 4 टक्के लोक कोरोना बाधित आढळले. संभाजीनगर, केशवनगरमधील 75 टक्के लोकांना कोरोना होऊन गेला आहे. शहरातील साडे आठ लोकसंख्येत अँटीबॉडी तयार झाल्या असून
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ते सक्षम आहेत.

पुढील धोरण, नियोजन, व्युहरचना ठरविण्यासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे. पुढील दिशा ठरविली जाणार आहे. कृती आराखड्यावर काम केले जात आहे.

कोविड तांत्रिक समिती सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले, ज्या देशात ट्रेंड आला होता. त्या देशात दुसरी लाट आली आहे. त्यामुळे आपल्याकडेही काही सांगता येत नाही. आता हिवाळा सुरू झाला आहे. हा ऋतू कोरोनासाठी पोषक आहे. त्यामुळे दुसरी लाट आली तर काय तयारी असली पाहिजे. त्याचा अभ्यास केला जात आहे.

जम्बो, खासगी रुग्णालये, खाटा, मनुष्यबळ, रुग्णवाहिका, औषधे, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर सुविधा सज्ज ठेवत आहोत. नॉन कोविडसाठी पालिकेचे हॉस्पिटल चालू करण्याची सूचना केली आहे. खासगी डॉक्टरानी ताप आलेल्या रुग्णांची माहिती दररोज पालिकेला देणे अपेक्षित आणि आवश्यक आहे.

त्यामुळे लवकरात लवकर सूचना मिळू शकतील. दूसरी लाट येणार असे सांगितले जात असले तरी महाराष्ट्रातील हिवाळा आणि उत्तर भारतातील हिवाळा यामध्ये फरक आहे. कोविडच्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये डेथ ऑडिट कमिटी बंधनकारक केली आहे.

सार्स – कोवी 2 सर्वेक्षण म्हणजे काय?

साथीच्या रोगांच्या काळात प्रत्यक्ष आढळलेल्या रुग्णांव्यतिरिक्त लोकसंख्येतील किती टक्के नागरिकांना साथरोग होऊन गेला, हे पाहण्यासाठी सार्स – कोवी 2 सर्वेक्षण केले जाते. निरोगी नागरिकांची अँटिबॉडी चाचणी करून त्याद्वारे त्यांच्यामध्ये कोरोनाच्या अँटिबॉडीज आहेत का, हे तपासले जाते. अँटिबॉडीज रोगातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये दिसून येतात. त्यामुळे किती टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडीज आढळल्या. यावरून किती लोकसंख्येला संसर्ग होऊन गेला हे तपासणे शक्य होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.