Pimpri news: नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वैद्यकीय मदतीमुळे कोरोनाविरोधातील लढाईला बळ – आयुक्त राजेश पाटील

संदीप वाघेरे यांच्यावतीने कोरोनाबाधित रुग्णांसाठी 50 बेड, 4 व्हेंटिलेटर आणि 2 हाई फ्लो मशीन

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या लढाईत दररोज निगेटिव्ह बातम्या कानावर पडतात. या पार्श्वभूमीवर नगरसेवक संदीप वाघेरे यांनी स्वतःच्या खर्चातून महापालिकेला 50 बेड, 4 व्हेंटिलेटर आणि 2 हाई फ्लो मशीन देऊन वेगळा आदर्श निर्माण केला आहे. जनता, प्रशासनाच्या लढाईला त्यांनी बळ दिले आहे. ही मदत निश्चितच खूप महत्त्वाची आणि मोठी असल्याचे मत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी व्यक्त केले. तसेच नगरसेवक वाघेरे यांच्या दातृत्वाचे कौतुक केले.

नगरसेवक संदीप वाघेरे यांनी स्वतःच्या खर्चातून कोरोनाबाधित रुग्णांसाठी महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाकरिता 50 बेड, 4 व्हेंटिलेटर आणि 2 हाई फ्लो मशीन दिल्या आहेत. त्याचे लोकार्पण आज (सोमवारी) झाले.

खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार विलास लांडे, गौतम चाबुकस्वार, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, पीसीएमटीचे माजी अध्यक्ष संतोष कुदळे, जिजामाताचे डॉ. बाळासाहेब होडगर, डॅा. रोहीत पाटील, डाॅ.संगिता तिरूमणी, डाॅ. करूना साबळे, स्वीकृत सदस्य कुणाल लांडगे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कुदळे उपस्थित होते. त्यावेळी महापालिका आयुक्त पाटील बोलत होते.

आयुक्त राजेश पाटील म्हणाले, “आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. नगरसेवक संदीप वाघेरे यांनी 50 बेड देऊन वेगळा आदर्श निर्माण केला आहे. जनता, प्रशासनाच्या लढाईला त्यांनी बळ दिले आहे. निश्चितच ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. वाघेरे यांची भूमिका नेहमी जनतेच्या हिताची असते. मी त्यांना पहिल्यादिवसापासून पाहत आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो.

त्यांच्या या उपक्रमामुळे इतर दानशूर व्यक्तीला प्रेरणा मिळेल. या प्रेरणेतून आणि सर्वांच्या सहभागातून महापालिका कोरोनाला हद्दपार करून पुढे वाटचाल केली जाईल. या लढाईत नकारात्मक भूमिका न घेता, सर्वांनी आपल्या परीने काय करता येईल. याचा विचार करून मदत करावी. संकटाच्या काळात सर्वांनी आपली आपली भूमिका योग्य पध्दतीने पार पाडावी “.

“इतर महापालिकेच्या तुलनेत शहरातील सोयी सुविधा खूप चांगल्या आहेत. महापालिकेकडे 450 व्हेंटिलेटर, 2500च्या वर ऑक्सिजन बेड आहेत. कालच खासगी दवाखान्याना 35 व्हेंटिलेटर बेड दिले आहेत. जम्बोत 40 बेड उपलब्ध केले जाणार आहेत. महापालिकेच्या नवीन चार हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचे 700 बेड उपलब्ध करणार आहोत. पुढच्या तीन महिन्यात या रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध होतील. 40 ते 45 टक्के बेड ग्रामीण भागातून आणि बाहेरून येणाऱ्या रुग्णांसाठी बेड देतो. सर्व रुग्णांना वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न करतो’, असेही आयुक्त पाटील यांनी सांगितले.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या माध्यमातून महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयामध्ये 50 बेड देण्यात आले. संदीप यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम होत आहे. या परिसरात संदीप चांगल्या प्रकारे काम करत आहेत. नगरसेवक म्हणून जनतेला साजेल असे काम ते करत आहेत. केवळ कोरोना कालावधीत नाही. तर, ज्यावेळी नागरिकांसमोर समस्या येतील त्या समस्या मार्गी लावण्याचे काम संदीप वाघेरे सातत्याने करतात.

50 बेड त्यांनी उपलब्ध करून दिले आहेत. याचा नागरिकांना उपयोग होईल. पुणे परिसरात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. शहरातील महापालिका रुग्णालयात जेवढी सुविधा आहे. तेवढी सुविधा कोणत्याही शहरात नाही. पनवेल सर्वात मोठे क्षेत्र असतानाही तिथे वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आजरोजी साडेसात हजार बेड उपलब्ध आहेत. महापालिकेच्या माध्यमातून रुग्णांना चांगल्या प्रकारची सोय उपलब्ध करून दिली जाते.

खासगी रुग्णालये रुग्णांची लूट करण्याचे काम करतात. गरीब रुग्णांना नाहक त्रास होतो. केवळ कोरोना कालावधीत नव्ह तर कायमस्वरूपीसाठी महापालिकेच्या माध्यमातून एक विभाग सुरू करावा. खासगी रुग्णालयांचे सातत्याने ऑडीट केले पाहिजे. काही जण व्यवसाय म्हणून या क्षेत्रात उतरले आहेत. काही चांगलेही काम करत आहेत. ठराविक रुग्णालयांनी व्यावसायिक स्वरूप दिले असून त्याला आळा घालावा”.

माजी आमदार विलास लांडे म्हणाले, “नगरसेवक संदीप वाघेरे यांनी लोकाभिमुख कार्यक्रम घेतला आहे. जगामध्ये कोरोनाची महामारी मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शहरात आणखी काम करण्याची आवश्यकता आहे. त्यातून नागरिकांना दिलासा मिळेल. शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आयुक्तांनी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. मोठी कामे थांबवावीत. नागरिकांना अधिक मदत करावी”.

नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले, “सत्ता, पद, प्रतिष्ठा या पलिकडे जाऊन सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून मी हे काम करीत आहे. सत्ता आणि खुर्ची ही राबवायची असते उबवायची नाही हे ब्रिद घेऊन मी आत्तापर्यंत समाजात काम करीत आहे. आज आपण पाहिल तर कधी नव्हे ती अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारी आणि खाजगी रुग्णालय तुडुंब भरली आहेत. गेली कित्येक दिवस या शहरात साधारणपणे 2000 ते 2800 पेक्षा अधिक रुग्ण दररोज निष्पन्न होत आहे.

अनेक रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपकरण उपलब्ध होत नाहीत म्हणून पेशंटची ससेहोलपट होताना पाहून मला अतिशय दुःख झाले. दिवस-रात्र मदत करूनही परिस्थितीत सुधारणा होत असताना दिसत नाही. म्हणून मी सदविवेक बुद्धीने मला जे शक्य होईल त्या पद्धतीने मदत करीत आहे. शहरातील रुग्णांना काही प्रमाणात का होईना दिलासा देण्याचा प्रयत्न या उपकरणाच्या माध्यमातून मी करीत आहे”.

“ज्या समाजाने मला नेतृत्व करायची संधी दिली त्यांच्या ऋणातून थोड्याफार प्रमाणात उतराई होण्यासाठी मी हा प्रयत्न करीत आहे. 50 बेड, 4 व्हेंटिलेटर आणि 2 हाई फ्लो मशीनचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे.   या वैद्यकीय उपकरणांतून काही रुग्णांना तरी दिलासा मिळाला तरी माझे हे परीश्रम सत्कारणी लागेल असं मी समजेल”.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.