Pimpri New: जमिनीच्या व्यवहारासाठी वापरल्या ‘त्या’ बनावट नोटा; तिघांना अटक

Pimpri News: Counterfeit notes used for land transactions; Three arrested आरोपींनी कटारिया यांना बनावट नोटा दिल्या. कटारिया यांनी आरटीजीएस किंवा बॅंकेत पैसे डिपॉझिट करण्यास सांगितले. मात्र आरोपींनी रोकड घेण्याचा आग्रह केला.

एमपीसी न्यूज – पिंपरी पोलिसांनी 2 लाख 98 हजार रुपयांच्या बनावट नोटा पकडल्या असून त्यातील चौघांवर गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे. आरोपींनी बनावट नोटा चक्क जमिनीच्या व्यवहारासाठी उसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी वापरले असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

अभिषेक प्रदीप कटारिया (वय 20, रा. आनंद पार्क, थेरगाव), ओंकार शशिकांत जाधव (वय 20, रा. कुणाल इस्टेट, केशवनगर, चिंचवड), सुरेश भगवान पाटोळे (वय 40, रा. ओंकार नगर, पाटेवस्ती, आनंदवन आश्रम, फुगेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी शहाजी वसंत धायगुडे यांनी सोमवारी (दि.17) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पावणे दहा वाजता पोलिसांना माहिती मिळाली की, एका स्विफ्ट कारमधून दोघेजण येणार असून त्यांच्याकडे बनावट नोटा आहेत.

त्या नोटा ते दोघे चिंचवड येथे कुणालातरी देणार आहेत. त्यानुसार पिंपरी पोलिसांनी रात्री मुंबई-पुणे महामार्गावर खंडोबा माळ, आकुर्डी येथे नाकाबंदी लावली.

रात्री साडेदहा वाजता एक लाल रंगाची स्विफ्ट कार (एमएच 14 जीवाय 6060) खंडोबा माळ चौकाकडून चिंचवडच्या दिशेने अली. पोलिसांनी कार चालकाला कार थांबवण्याचा इशारा केला. मात्र, चालक पोलिसांना चुकवून कार पुढे नेण्याचा प्रयत्न करून लागला. पोलिसांनी पुढे काही अंतरावर देखील पोलीस तैनात केले होते.

मोहननगर मार्शलवरील पोलिसांनी कारला आपली दुचाकी आडवी लावली आणि कार अडवली. दोघांना खाली उतरवून त्यांच्याकडे पळून जाण्याचे कारण विचारले असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यामुळे दोघांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. तसेच कारची झडती घेतली.

कारच्या डॅशबोर्डमध्ये दोन हजार रुपये दराच्या 149 नोटा आढळून आल्या. त्या नोटांबाबत चौकशी केली असता त्या नोटा खोट्या असल्याचे आरोपींनी सांगितले. दोघांना पोलिसांनी अटक केली.

त्यानंतर कारमधील दोघांचे आणखी दोन साथीदार असल्याचे आरोपींनी सांगितले. पोलिसांनी त्यांच्या आणखी एका साथीदाराला अटक केली. चौथ्या साथीदाराच्या शोधात पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

नोटांच्या वापराबाबत चौकशी करताना पोलिसांना माहिती मिळाली की, जमिनीच्या व्यवहारात आरोपींना पैशांची गरज असल्याने त्यांनी आरोपी अभिषेक कटारिया याच्याकडून काही पैसे उसने घेतले होते.

तीन महिने पैशाची मागणी करूनही आरोपी ते परत देत नव्हते. त्यानंतर आरोपींनी फोनही बंद करून ठेवला होता. मात्र कटारिया यांनी पाठपुरावा केल्यानंतर आरोपींनी त्यांना पैसे देण्याची तयारी दर्शविली.

आरोपींनी कटारिया यांना बनावट नोटा दिल्या. कटारिया यांनी आरटीजीएस किंवा बॅंकेत पैसे डिपॉझिट करण्यास सांगितले. मात्र आरोपींनी रोकड घेण्याचा आग्रह केला. तसेच दिलेल्या नोटा दोन नंबरच्या असल्याने त्या बाजारात आत्ताच फिरवू नकोस, असे सांगितले. तसेच आरोपींनी ओंकार जाधव यांनाही बनावट नोटा दिल्या असल्याची माहिती मिळाली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.