Pimpri News: भाजप सरचिटणीस बाबू नायर यांचा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

एमपीसी न्यूज – भाजपचे माजी नगरसेवक, पक्षाचे शहर सरचिटणीस बाबू नायर यांनी आज (गुरुवारी) भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. नायर यांची पुढील भूमिका काय असेल हेही स्पष्ट झाले नाही.

भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांना राजीनामा पत्र पाठविले आहे. पक्षाच्या मोरवाडीतील कार्यालयात जाऊन नायर यांनी राजीनामा दिला आहे. बाबू नायर पूर्वी काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसकडून ते महापालिकेत स्वीकृत नगरसेवक देखील होते. त्यांनी काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

बाबू नायर हे उच्चशिक्षित, शांत, संयमी आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास असलेल्या केरळ मधील लोकांचा त्यांना मोठा पाठिंबा आहे. नायर यांनी भाजप सरचिटणीस पदावर काम केले. 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आली. त्यानंतर भाजपने नायर यांना स्वीकृत नगरसेवक केले. परंतु, नायर यांनी आज अचानक शहर भाजपच्या सरचिटणीसपदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सहकार्याबाबत कोअर कमिटी, पक्षाचे कार्यकर्ते या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.