Pimpri News : शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठी सरकारच्या भाडोत्री लोकांनी हिंसाचार केला – कामगार आणि सामाजिक संघटना

एमपीसी न्यूज : दिल्ली येथे शेतकरी आंदोलनामध्ये जो हिंसाचार झाला, त्याचा निषेध करण्यासाठी व गोडसेवादी विचारांना विरोध करण्यासाठी महात्मा गांधी यांच्या बलिदान दिनी आज कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि किसान संघर्ष समितीच्या वतीने एक दिवसाचे लक्षणीय उपोषण करण्यात आले. हे उपोषण पिंपरीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे करण्यात आले.

यावेळेस शेतकऱ्यांचे आंदोलन बदनाम करण्यासाठी सरकारने भाडोत्री लोक पाठवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. कामगार, शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित समस्या वाढल्यामुळे सुरू असलेली ही आंदोलने देशद्रोही ठरवणारे सरकारचे प्रयत्न निषेधार्थ आहेत, असा आरोप कामगार नेते कैलास कदम यांनी केला.

यावेळेस शेतकरी आंदोलनाला देशद्रोही संबोधणाऱ्या आजच्या ढोंगी राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात गांधीवादाशी गद्दारी केली होती, असे मानव कांबळे म्हणाले

महात्मा गांधींची हत्या करणारा पहिला दहशतवादी नथुराम गोडसे होता. गांधी गेले पण गांधी विचार त्यांच्या हत्येमुळे जगभर पसरले. देशाचा स्वातंत्र्यदिन काळा दिवस साजरा करणारे आणि 50 वर्षे राष्ट्रीय ध्वजारोहण ज्यांनी केले नाही, ती विचारसरणी आज देशभक्ती शिकवत आहे. आम्ही शेतकरी आंदोलनास पाठिंबा देत आहोत, असे गणेश दराडे यांनी सांगितले.

नवे कामगार आणि कृषी कायदे यावर संसदेच्या दोन्ही सदनामध्ये व्यापक चर्चा झाली पाहिजे. कोरोना काळात सरकार कायदे करण्यासाठी उतावीळ झाले. सरकार हे कॉर्पोरेटच्या हितासाठी काम करत आहेत, असे मारुती भापकर यांनी सांगितले.

या आंदोलनात माकप, इंदिरा काँग्रेस, बारा बलुतेदार, नागरी हक्क सुरक्षा समिती, डी वाय एफ आय, जनवादी महिला संघटना, ओबीसी संघर्ष समिती, फेरीवाला क्रांती महासंघ, प्रहार जनशक्ती संघटना, स्वराज अभियान यांच्याबरोबर अनेक संघटना सहभागी झाल्या असून मारुती भापकर, मानव कांबळे, अनिल रोहम, गणेश दराडे, सलीम सय्यद, काशीनाथ नखाते, इब्राहिम खान, भाई विशाल जाधव, संजय गायके, संदेश नवले, अजीज शेख, शिवराम ठोंबरे, मनोज गजभार, आनंदा कुदळे, काळूराम गायकवाड, गौतम गजभार, प्रदीप पवार आदी कार्यकर्ते यांत सामील झाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.