Pimpri News : ‘युपीएससी’ची मुलाखत आत्मविश्वासाने दिल्यास यश हमखास : आयुक्त पाटील

एमपीसी न्यूज – स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांनी मुलाखतीला सामोरे जाताना आत्मविश्वास, चेह-यावर आनंद, उत्तम संवाद साधण्याचे कौशल्य आणि विविध विषयांचे अचूक ज्ञान ठेवल्यास यश हमखास मिळते, असा कानमंत्र महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला.

सन 2020 या वर्षामध्ये घेण्यात आलेल्या युपीएससी लेखी परिक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन घेण्यासाठी आज (बुधवारी) पिंपरी- चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

आयुक्त राजेश पाटील यांनी प्रशासकीय सेवेतील कौशल्य विकास, संवाद, नेतृत्व कसे असावे, प्रामाणिकपणा, संवेदनशीलता, राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय प्रश्नांबाबत स्वत:चे वैयक्तीक मत असणे, स्वत:ची ओळख निर्माण करणे याबाबत या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शिस्त, नियोजन, वेळेचे व्यवस्थापन कसे असावे, प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा कसा करावा इत्यादी बाबींच्या टिप्सही दिल्या. या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत तसेच मुलाखतीला सामोरे कसे जावे याबाबत आयुक्त पाटील यांनी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी महापालिकेच्या कामकाजाबाबतची विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळेस ज्ञानप्रबोधिनी स्पर्धा परिक्षा केंद्राचे समन्वयक उमेश रामटेके उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.