Pimpri news: दहा दिवसांत महापालिका रुग्णालयात व्हेंटिलेटरच्या 380 खाटा उपलब्ध होणार

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या गंभीर, अतिगंभीर रूग्णांना आवश्यक असलेल्या व्हेंटिलेटरच्या खाटांमध्ये वाढ केली जाणार आहे. महापालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये सद्यस्थितीत 74 खाटा असून त्यात वाढ करून 290 खाटांची उपलब्धता केली जाणार आहे. शहरातील कंपन्या सीएसआरअंतर्गत 90 खाटा देणार आहेत. पुढील दहा दिवसांत जम्बो हॉस्पिटल, ऑटो क्लस्टर आणि महापालिकेच्या रुग्णालयात व्हेंटिलेटरच्या 380 खाटा उपलब्ध होणार आहेत. तसेच होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत असलेल्या 20 हजार रुग्णांची विचारपूस करण्यासाठी आजपासून कॉल सेंटर सेवा सुरू झाली आहे.

याबाबतची माहिती महापालिका प्रवक्ते शिरीष पोरेडी, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत दिली.

पोरेडी म्हणाले, नेहरूनगर येथील जम्बो हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर खाटांची संख्या 60 होती. त्यात 40 खाटा वाढविल्या जाणार असून अशा 100 खाटा उपलब्ध होतील. ऑटो क्लस्टर कोविड केअर सेंटरमधील खाटांची संख्या 14 होती. त्यात 16 ने वाढ करून खाटांची संख्या 30 वर नेली जाणार आहे.

थेरगाव, जिजामाता, आकुर्डी आणि भोसरी हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी 40 याप्रमाणे 160 व्हेंटिलेटरच्या खाटा उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचबरोबर शहरातील विविध कंपन्या सीएसआरअंतर्गत महापालिकेला व्हेंटिलेटरच्या 90 खाटा देणार आहेत. पुढील दहा दिवसांत व्हेंटिलेटरच्या 380 खाटा उपलब्ध होणार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

महापालिकेची दहा कोविड केअर सेंटर सुरू आहेत. तिथे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. दहा सेंटरमध्ये 2 हजार 18 खाटा आहेत. त्यातील 1732 खाटांवर रुग्ण दाखल आहेत. 186 खाटा शिल्लक आहेत. महापालिका रुग्णालयात आज एकही व्हेंटिलेटरची खाट उपलब्ध नाही. खासगी रुग्णालयात चार खाटा उपलब्ध आहेत.

तर, लक्षणेविरहित 20 हजार रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. या रुग्णांना ऑक्सिजनपर्यंत जायची वेळ येवू नये, त्यांना योग्य सल्ला मिळावा. तत्काळ वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशाने कॉल सेंटरची सुविधा सुरू केली आहे. त्यांना दरररोज फोन केला जाणार आहे. यामुळे रुग्णांची परिस्थिती गंभीर होणार नाही.

रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाच्या प्रमाणात वाढ केली जाणार आहे. उकडलेली अंडी, शेंगदाणे लाडू असे सात्विक, पौष्टिक जेवण दिले जाणार आहे. महापालिकेकडे रेमडेसिवीर इंजेक्शन पुरेसे उपलब्ध आहेत. त्याची कमतरता नाही.

शहरातील कोरोना रुग्णसंख्येचा कालचा पॉझिटीव्हीटी दर 24.26 टक्के होता. आतापर्यंतचा 19.58 टक्के होता. तर, कालचा मृत्यूदर 1.73 टक्के होता. आजपर्यंतचा 1.28 टक्के होता, असेही शिरीष पोरेडी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.