Pimpri News: फुलेसृष्टी, शाहूसृष्टीच्या भूमीपूजनाची निमंत्रण पत्रिका पालकमंत्र्यांना दिली – महापौर ढोरे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने फुलेसृष्टी, शाहूसृष्टीच्या कामाच्या भूमीपूजनाच्या निमंत्रण पत्रिकेत पालकमंत्री अजित पवार यांचे नाव टाकले आहे. त्यांना पत्र आणि निमंत्रण पत्रिका दिलेली आहे, असे महापौर उषा ढोरे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस विरोधक आहेत. त्यांचे चालायचेच, त्यांच्या पध्दतीने ते मांडतात. आजचा भूमिपूजनाचा कार्यक्रम नियोजित वेळेत होईल, असे ढोरे यांनी सांगितले.

महापालिकेच्या वतीने पिंपरीत फुलेसृष्टी आणि चिंचवडमध्ये शाहूसृष्टी उभारण्यात येणार आहे. या कामाचे आज (मंगळवारी) खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे. पण, या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची वेळ घेतली नाही. त्यांना कोणतीही कल्पना दिली नाही. त्याला राष्ट्रवादीने आक्षेप घेतला. फुलेसृष्टी, शाहूसृष्टीच्या कामाच्या भूमीपूजनासाठी उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांची रितसर वेळ घेतली नाही. केवळ निमंत्रणपत्रिकेवर नाव टाकण्याची औपचारिकता पूर्ण केली.

पवार यांना याबाबत काहीच माहिती नाही. ते उद्या आले नाही. तर, नकारात्मक चर्चा होईल, असे सांगत महापौर, आयुक्तांच्या कार्यपद्धीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला. छत्रपती संभाजीराजे यांना आमचा आक्षेप नसून ते वंदनीय, आदरणीय व्यक्ती आहेत. पण, सत्ताधा-यांनी पालकमंत्र्यांची नियोजित वेळ घेणे आवश्यक होते. प्रोटोकॉलचे पालन करणे गरजेचे होते, अशी भूमिका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर, स्थानिक नगरसेविका मंगला कदम यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला होता.

याबाबत बोलताना महापौर उषा ढोरे म्हणाल्या, “राष्ट्रवादी काँग्रेस विरोधक आहेत. त्यांचे चालायचे, त्यांच्या पध्दतीने ते मांडतात. निमंत्रण पत्रिकेत पालकमंत्री अजित पवार यांचे नाव टाकले आहे. त्यांना पत्र  आणि निमंत्रण पत्रिका दिलेली आहे. आजचा भूमिपूजनाचा कार्यक्रम नियोजित वेळेत होईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.