Pune News: नामांतराचे लोण आता पुणे जिल्ह्यातही, वेल्हा ऐवजी ‘राजगड तालुका’ आणि मळवली ऐवजी ‘एकवीरा देवी रेल्वे स्टेशन’! 

एमपीसी न्यूज – शहरांची, गावांची नाव बदलण्याचे लोण आता पुणे जिल्ह्यातही पोहोचले आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुका आणि मळवली रेल्वे स्थानकाला नवीन नाव मिळणार आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नामांतराचा हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.

वेल्हे तालुक्यात राव राजगड करावं आणि मळवली रेल्वे स्टेशनला कार्ला येथील एकवीरा देवीचे नाव देण्यात यावे, असा हा प्रस्ताव होता. त्यानंतर आता हे दोन्ही प्रस्ताव मंजुरीसाठी अनुक्रमे राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठविण्यात येतील, अशी घोषणा जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी सभागृहात केली.

राजा शिवाजी ग्रामीण विकास मंडळाने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतारे यांच्याकडे वेल्हे तालुक्याचे नाव बदलून राजगड ठेवावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर रणजीत शिवतारे यांनी नाव बदल याबाबत ठराव सभागृहात मांडला. सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्यांनी या ठरावास एकमुखी पाठिंबा दिला. त्यानंतर एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला.

याशिवाय मावळ तालुक्यातील कार्ला येथील एकवीरा देवी महाराष्ट्रातील अनेकांचे श्रद्धास्थान आहे. या तालुक्यात मळवली येथे रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनला एकवीरा देवीचे नाव द्यावे अशी मागणी करणारा ठराव जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांनी मांडला होता. त्यानंतर त्यांचा हा ठराव देखील एकमताने मंजूर करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.