Pimpri News : कर्तव्य बजावताना वीरमरण येणे ही अभिमानाची गोष्ट – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या पोलिसांना पिंपरी चिंचवड पोलिसांकडून श्रद्धांजली

एमपीसी न्यूज – पोलीस अहोरात्र समाजाच्या सेवेसाठी जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. देशाची, राज्याची आंतरिक सूरक्षा ही पोलिसांच्या हातात आहे. पोलीस दलात कर्तव्य बजावताना वीरमरण येणे ही अभिमानाची गोष्ट आहे, असे मत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले.

मुंबई येथे 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या पोलीस अधिकारी व अमंलदार यांना पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी श्रद्धांजली अर्पण केली. तसेच कार्यक्रमात संविधान दिनानिमित्त संविधान वाचून पोलिसांना शपथ देण्यात आली. या कार्यक्रमात आयुक्त कृष्ण प्रकाश बोलत होते.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासह अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, उप-आयुक्त मंचक इप्पर, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) आर. आर. पाटील तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी 26/11 च्या दहशदवादी हल्यात वीरमरण प्राप्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांना श्रद्धाजंली अर्पण केली.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, “आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून पोलीस विभागात कर्तव्य बजावत असताना वीरमरण येणे ही एक अभिमानाचीच गोष्ट आहे. पोलीस अहोरात्र समाजाच्या सेवेसाठी जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत.” या वेळी आयुक्तांनी कविसिद्ध व नाथपंती यांच्या दोन ओव्यांचा उपदेश केला की, “अच्छा हुवा की मेरा पती लढाई के मैदान में मारा गया… मे तो लज्जेसे जमीनमे गढ़ जाती अगर वो लढाई के मैदान से भागकर घर वापस आता.”

पुराणकाळी युद्धासाठी क्षत्रियांची गरज लागत होती. पण आता पोलीसच खरे योद्धे होवून दहशदवादी, दरोडेखोर, नक्षलवादी समाजात दहशत निर्माण करणा-या समाजकंटक व्यक्तीपासून समाजाचे रक्षण करत आहेत. देशाची, राज्याची आंतरिक सूरक्षा ही पोलिसांच्या हातात आहे. आता स्वस्थ बसू नका. समाजाचे रक्षण करणे, वाईट वृत्तींचा नायनाट करणे, हाच आपला परमधर्म आहे. तसेच आज संविधान दिवस आहे. संविधान हा देशाचा भक्कम पाया समजला जातो. संविधानाने आपल्याला दिलेल्या अधिकाराचा आपण नेहमी सन्मान केला पाहीजे, असेही आयुक्त म्हणाले.

अपर आयुक्त रामनाथ पोकळे यांनी 26/11 रोजी विरमरण प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे हौतात्म्य हे नेहमीच प्रत्येक पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्मरणात राहणार आहे. महाराष्ट्रात मुंबई येथे प्रथमच दोन दहशदवाद्याना जिवंत पकडण्यात पोलीस दलाला यश आले. यात वीरमरण आलेल्या सर्वांचा महत्त्वाचा वाटा आहे असे म्हणत पोकळे यांनी वीरमरण प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना श्रद्धांजली अर्पण केली.

उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दहशदवादी हल्यात वीरमरण आलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच आज भारतीय संविधान दिनानिमित्त सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना संविधान वाचून शपथ दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय घोळवे यांनी केले. अक्षय घोळवे व संतोष महिश्वरी यांनी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.