Pimpri News : इंदूरप्रमाणे पिंपरी चिंचवडमधील 4 वॉर्डांमध्ये कचऱ्याचे अलगीकरण होणार

एमपीसी न्यूज – मागील चार वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणामध्ये प्रथम क्रमांकाचे शहर ठरलेल्या मध्यप्रदेशातील इंदूरचे पॅटर्न पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येणार आहे. इंदूरप्रमाणे शहरातील 4 वॉर्डांमध्ये प्रायोगिक तत्वावर कच-याचे अलगीकरण केले जाणार आहे. बेसिक्स म्युनिसिपल वेस्ट व्हेंचर्स या संस्थेला तीन महिन्यासाठी हे काम देण्यात येणार आहे.

महापालिकेतील पदाधिकारी आणि अधिका-यांनी नुकताच इंदूर दौरा केला. या दौऱ्यात स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, स्थायी समिती सदस्य शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम, अभिषेक बारणे, संतोष कांबळे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय तसेच सीटीओचे प्रतिनिधी यांचा सहभाग होता.

या दौ-याची माहिती सत्तारुढ पक्षनेते ढाके यांनी आज (मंगळवारी) दिली. इंदूरप्रमाणेच शहरातील 4 वॉर्डांमध्ये तत्वावर कच-याचे विलगीकरण केले जाणार आहे. त्यासाठी बेसिक्स म्युनिसिपल वेस्ट व्हेंचर्स या संस्थेस कचरा विलगीकरणाच्या कामकाजासाठी नेमण्यात येणार आहे. ही संस्था इंदूरमध्ये जागेवरच कच-याचे अलगीकरण करते. शहरामध्येही महापालिकेमार्फत इंदूर शहराप्रमाणेच उपाययोजनांचा अवलंब केला जाणार असून यासाठी इंदूर महापालिकेचे सर्वतोपरी सहकार्य घेण्यात येणार आहे.

इंदूरमध्ये कचरा विलगीकरण हे 3 ऐवजी 6 प्रकारे केले जाते. ओला, सुका, घरगुती घातक, प्लॅस्टीक, जैववैद्यकीय आणि इलेक्ट्रॉनिक यानुसार वर्गीकरण करण्यात येते. याप्रमाणे विलगीकरण असल्याशिवाय कचरा स्वीकारण्यात येत नाही. कचरा संकलनासाठी नियुक्त असलेल्या वाहनांचे मार्ग, वेळ कधीही बदली जात नाही.

यासाठी आरोग्य निरीक्षक, मुख्य आरोग्य निरिक्षक, आरोग्य अधिकारी, आयुक्त व इतर अधिकाऱ्यांकडे वॉकी-टॉकीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. जेणेकरून कचरा संकलन व वहनाबाबत कोणतीही तक्रार असल्यास सर्व अधिकाऱ्यांना त्याची माहिती मिळते. त्यानुसार समस्येचे तातडीने निराकरण करण्यात येते.

निवासी परिसरामध्ये वाहनांचे गट, वेळ निश्चित आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक/व्यापारी आस्थापनांमधील कचरा संकलनाची पध्दत व वाहनांचे गट व वेळ निश्चित करण्यात आलेली आहे. छोट्या वाहनांद्वारे संकलिन करण्यात आलेला कचरा हा कचरा स्थानांतरण केंद्रामध्ये आणण्यात येतो. त्याठिकाणी बसविण्यात आलेल्या स्टेशनरी कॉम्पॅक्टरमध्ये विलगीकृत अमलेला कचरा टाकण्यात येतो.

अनेक छोट्या वाहनांमधील कचरा हा कॉम्पॅक्ट स्वरुपात स्टेशनरी कॉम्पॅक्टरद्वारे हुक लोडरमध्ये टाकला जातो. त्याद्वारे कचरा डेपोपर्यंत त्याचे वहन केले जाते. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरातही कारवाई करण्याचे नियोजन असल्यचे ढाके यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.