Pimpri News: भाजपमध्ये निष्ठावंतांचे खच्चीकरण – रवी लांडगे

'योग्यवेळी योग्य निर्णय' घेणार

एमपीसी न्यूज – गेली 35 वर्षे आम्ही भाजपशी प्रामाणिकपणे, निष्ठेने काम करत आहोत. महापालिकेत सत्ता आल्यावर किमान सन्मानाचे पद मिळावे, अशी आमची इच्छा होती. आमदार महेश लांडगे आणि
वरिष्ठांनी दोन वर्षांपूर्वी स्थायी समिती अध्यक्ष करतो असा शब्द मला दिला होता. मात्र, दोनही वर्षे मला डावलले. माझी दखल घेतली नाही. पक्षात जुन्या, निष्ठावान कार्यकर्त्यांचे खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप भाजप नगरसेवक रवी लांडगे यांनी केला.

तसेच भाजपच्या स्थानिक, वरिष्ठ नेत्यांनी मला डावलले असून ‘योग्यवेळी योग्य निर्णय’ घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी रवी लांडगे इच्छुक होते. परंतु, पक्षाने नितीन लांडगे यांना संधी दिली. नाराज झालेल्या रवी लांडगे यांनी तडकाफडकी स्थायी समिती सदस्यत्वाचा महापौर उषा ढोरे यांच्याकडे राजीनामा दिला.

त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रवी लांडगे म्हणाले, माझे वडील 1986 आणि 1992 मध्ये भाजपच्या तिकिटावर महापालिकेवर निवडून आले होते. त्यानंतर 1997 मध्ये चुलते अंकुशराव लांडगे निवडून आले होते. त्यांनी भाजपच्या ‘रोपा’चा वटवृक्ष केला. अंकुश लांडगे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आशा लांडगे महापालिकेवर निवडून आल्या. 2017 मध्ये मी बिनविरोध निवडून आलो.

गेली 35 वर्षे आम्ही भाजपशी प्रामाणिकपणे, निष्ठेने काम करत आहोत. महापालिकेत सत्ता आल्यावर किमान सन्मानाचे पद मिळावे, अशी आमची इच्छा होती. आर्थिक लाभासाठी कोणतेही पद मागत नव्हतो. मला दोन वर्षे का डावलले, हे समजत नाही. स्थानिक नेतृत्व, पक्षश्रेष्ठींनी का दखल घेतली नाही,याचे आत्मपरीक्षण करत आहे.

पक्षात जुन्या, निष्ठावान कार्यकर्त्यांचे खच्चीकरण सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच भाजपच्या स्थानिक, वरिष्ठ नेत्यांनी डावलले, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.