Pimpri News: महापालिका आयुक्तांचा ‘फुगीर’ अर्थसंकल्प; गतवर्षीपेक्षा 485 कोटींनी फुगविला अर्थसंकल्प

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 2021-22 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात कोणतेही नवीन प्रकल्प नाहीत. जुन्याच योजनांवर तरतूद करत अर्थसंकल्प फुगविण्यात आला आहे. तब्बल 485 कोटी रुपयांचा आयुक्तांचा फुगीर अर्थसंकल्प आहे. दरम्यान, तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर प्रशासनाने हा अर्थसंकल्प तयार केला आहे.

मागीलवर्षी मूळ 5232 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6 हजार 627 कोटी 99 लाख रुपयांचा अर्थसंकल्प होता. कोरोनामुळे उत्पन्न घटलेले असतानाही अर्थसंकल्प फुगविण्यात आला आहे. यंदा मूळ 5 हजार 588 कोटी 78 लाख तर केंद्र, राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 7 हजार 112 कोटी 1 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल 485 कोटींनी यंदाचा अर्थसंकल्प फुगला आहे.

अर्थसंकल्पात कोणतेही नावीन्यपूर्ण प्रकल्प नाहीत. जुने, कामे चालू असलेले प्रकल्पच वैशिष्ट्ये म्हणून दाखविली आहेत. त्यासाठी तरतूद केली आहे. नवीन कोणताही प्रकल्प अर्थसंकल्पात नाही. जुन्याच कामांसाठी तरतूद करत आकडे फुगविण्यात आले आहेत. केवळ आकड्यांचा खेळ करत अर्थसंकल्प फुगविल्याचे दिसून येत आहे.

‘व्हिजन’ ठेवून अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करणार – आयुक्त पाटील
आंतरराष्ट्रीय दर्जाचे राहण्यायोग्य शहर करण्याचे व्हिजन ठेवून अर्थसंकल्पाची अंमलबजावणी केली जाईल. शास्वत विकासावर भर राहील. समाजातील सर्व घटकांशी समन्वय साधून कामे मार्गी लावण्याच्या दृष्टीने काम करणार आहोत. मालमत्ता करातून उत्पन्न वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.