Pimpri News: महापालिकेकडून पथारीवाल्यांचे सर्व्हेक्षण होणार, पाच संस्थांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – पदपथांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी शहरातील पथारीवाल्यांचे सर्व्हेक्षण केले जाणार आहे. या सर्व्हेक्षणासाठी महापालिकेतर्फे पाच खासगी संस्थांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामध्ये एका संस्थेला चार क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील, तर उर्वरित चार संस्थांना प्रत्येकी एका क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील वॉर्डाचे सर्वेक्षणाचे काम मिळणार आहे.

महापालिकेने 2012-13 मध्ये शहरातील टपरी, हातगाडी, पथारी व फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले होते. त्यानंतर बायोमेट्रिक सर्वेक्षण झाले. पात्र-अपात्र लाभार्थी ठरविण्यात आले. मात्र, हॉकर्स झोनचा विषय कागदावरच राहिला.

त्यामुळे महापालिकेने पुन्हा खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण करण्याचे नियोजन केले. पथविक्रेत्यांची माहिती संकलित करणे, अपलोड करणे, ओळखपत्र देणे, हॉकर्स प्रमाणपत्र देणे, त्यात दुरुस्त्या करण्याचे काम संस्थेने करायचे आहे.

या अंतर्गत ओळखपत्रासाठी 20 रुपये, हॉकर्स प्रमाणपत्रासाठी लॅमिनेशनसह 25 रुपये आणि मनुष्यबळासाठी 75 रुपये असा 120 रुपये खर्च ठरविण्यात आला. 21 ऑक्‍टोबर 2020 रोजी स्थायी समिती सभेने प्रतिपथ विक्रेता 120 रुपये या दराने सर्वेक्षण करण्यास मान्यता दिली.

शहरात अंदाजे 40 हजार पथविक्रेते गृहीत धरण्यात आले आहेत. त्यासाठी इच्छुक संस्थांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. या कामासाठी 48 लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यानुसार, 11 जणांनी या निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला.

पथविक्रेता सर्वेक्षणाचे कामकाज तत्पर होण्यासाठी एकापेक्षा अधिक संस्थांना सर्वेक्षणाचे काम देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये खाडे कन्स्ट्रक्‍शन या ठेकेदाराने प्रतिपथ विक्रेता 60 रुपये या लघुत्तम दराने निविदा सादर केली.

त्यामुळे त्यांना 50 टक्के सर्वेक्षणाचे काम देण्यात येणार आहे, तर ओंकार कन्स्ट्रक्‍शन, जय गणेश एंटरप्रायजेस, काश आय टी सोल्युशन आणि प्राइम सर्जिकल या उर्वरित चार ठेकेदारांनी खाडे कन्स्ट्रक्‍शन यांच्या दराने काम करण्याची तयारी दर्शविली आहे.

त्यामुळे त्यांना उर्वरित सर्वेक्षणाचे काम दिले जाणार आहे. त्यानुसार, खाडे कन्स्ट्रक्‍शन यांना अ, ब, ड आणि फ या चार क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वॉर्डाचे सर्वेक्षणाचे काम मिळणार आहे, तर उर्वरित चार ठेकेदारांना प्रत्येकी एका क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वॉर्डचे काम मिळणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.