Pimpri News: ‘रुग्णालयातील ऑक्सिजन साठवणूक टाक्या, फायर व्यवस्थेचे तात्काळ ऑडिट करा’ – सतिश कदम

एमपीसी न्यूज – नाशिक येथील झाकिर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीमुळे 22 रुग्णांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व रुग्णालयांमधील ऑक्सिजन साठवणूक टाक्या तसेच फायर व्यवस्थेचे तात्काळ ऑडिट करावे, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतिश कदम यांनी केली.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात कदम यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या प्रचंड वाढू लागली. यातील बहुतेक रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने कोरोना रुग्णालयात रुपांतर केलेल्या बहुतेक रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयात ऑक्सिजन साठवणूक टाक्या बसवायला सुरुवात केली. अनेक रुग्णालयांनी आपली क्षमता दुप्पट केली. या सर्वांत ऑक्सिजन टाक्यांतून अथवा रुग्णालयात या टाक्यांच्या माध्यमातून ऑक्सिजन वाहून नेताना गळती झाल्यास ती तात्काळ रोखणे. तसेच तोपर्यंत रुग्णांच्या ऑक्सिजनची पर्यायी व्यवस्था केली आहे किंवा अथवा नाही, याची ठोस माहिती आरोग्य यंत्रणा तसेच महापालिका प्रशासनाकडे असला हवी.

महापालिकेच्या हद्दीत असलेल्या खासगी रुग्णालयांतील ऑक्सिजनचा साठा कितपत आहे. तसेच ऑक्सिजनचा साठा किती व कुठे उपलब्ध आहे, याची माहिती प्रशासनाला असणे गरजेचे आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व रुग्णालयांमधील ऑक्सिजन साठवणूक टाक्याचे तात्काळ ऑडिट करण्यात यावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.