Pimpri News: पवना धरण काठोकाठ! वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला पण, पाणीकपात कायम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण सप्टेंबरअखेर काठोकाठ भरले आहे. धरणात 99.70 टक्के पाणीसाठा आहे. यामुळे पुढील वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. 1 जूनपासून धरण क्षेत्रात 1684 मिली मीटर पावसाची नोंद झाली.

दरम्यान, धरण 100 टक्के भरले असले तरी, देखील शहरवासीयांना अनिश्चित काळासाठी दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागणार आहे. जोपर्यंत 30 एमएलडी अतिरिक्त पाणी मिळत नाही तोपर्यंत एकदिवसाआड पाणीपुरवठा कायम राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यंदा पावसाने ओढ दिली होती. जून, जुलैमध्ये धरण क्षेत्रात पाऊस पडला नव्हता. त्यामुळे पाण्याचे संकट वाढण्याची चिन्हे होती. पण, ऑगस्टमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. ऑगस्टअखेर पवना धरण शंभर टक्के भरले होते.

पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणातील येवा सुरूच आहे. 1 जूनपासून धरण क्षेत्रात 1684 मिली मीटर पावसाची नोंद झाली. तर, 64.71 टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. आजमितीला धरणात 99.70 टक्के पाणीसाठा आहे. पुढील वर्षभर पुरेल एवढा हा साठा आहे. त्यामुळे पाण्याची चिंता संपली आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 3817 मिली मीटर पाऊस झाला होता.

धरण 100 टक्के भरले असले. तरी, मागील दहा महिन्यांपासून सुरू असलेला दिवसाआड पाणीपुरवठा कायम आहे. पाणी कतापीपासून शहरवासीयांची सुटका नाही. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत नोव्हेंबर 2019 पासून पहिल्यांदा दोन महिन्यांसाठी एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. त्यांनतर तो कायम ठेवण्यात आला आहे. आता धरण 100 टक्के भरल्यानंतरही पाणी कपात कायम राहणार आहे. वाढीव पाणी जोपर्यंत उपलब्ध होत नाही. तोपर्यंत एकदिवसाआड पाणीपुरवठा कायम राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पवना धरणाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अन्वर तांबोळी म्हणाले, पवना धरणात 99.70 टक्के पाणीसाठा आहे. पुढील वर्षभर पुरेल एवढा हा साठा आहे. ऑगस्टमध्ये धरण 100 टक्के भरले होते. पिंपरी- चिंचवड शहरासाठी हायड्रोद्वारे 1200 क्यूसेकने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे पाणी कमी होत आहे. मागील आठ दिवसांपासून पाऊस थांबला आहे. पण, पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणातील येवा अद्यापही सुरू आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे म्हणाले, पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा आहे. पालिका नदीतून पाणी उचलत आहे. शहरासाठी महिन्याला 11 टक्के पाणी लागते. त्यानुसार 15 जुलै 2021 पर्यंत धरणातील पाणीसाठा पुरेल.

पवना धरणातील पाण्याची आजची आकडेवारी!

#गेल्या 24 तासात झालेला पाऊस 00 मिली मीटर

# 1 जूनपासून झालेला पाऊस 1684 मिली मीटर

# गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत झालेला एकूण पाऊस – 3817 मिली मीटर

#धरणातील सध्याचा पाणीसाठा 99.70% टक्के

# गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = 100% टक्के

# गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ 0.00% टक्के

# 1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ 64.71% टक्के

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.