Talegaon News : शहरात ‘माझे कटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद; 23 नवे कोरोनाबाधित रुग्ण

एमपीसी न्यूज – ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत गुरुवार (दि 24) रोजी तळेगाव शहरात लॉकडाऊन करून शहरातील नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली. दरम्यान या मोहिमेस नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या तपासणी दरम्यान 23 कोरोनाबाधित रुग्ण आढळले.

आमदार सुनील शेळके, प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, मुख्याधिकारी रवी पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या मोहिमेचा प्रारंभ झाला.

सकाळपासून नागरिकांच्या घरोघरी जाऊन तपासण्या करण्यास स्वयंसेवकांनी, शिक्षकांनी सुरुवात केली. यामध्ये शरीराचे तापमान तपासणे, ऑक्सिमीटरने ऑक्सिजन पातळी तपासणे. काही लक्षणे असल्यास अँटीजेन टेस्ट करणे, जास्त लक्षणे असल्यास स्वॅब टेस्ट अशा विविध प्रकारे तपासण्या करण्यात आल्या.

शहरातील तेरा प्रभागांमध्ये शिक्षक, नगर परिषद आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलीस, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, तसेच स्वयंसेवक यांची पथके या तपासण्यासाठी नेमण्यात आली होती. या पथकांच्याद्वारे प्रभागनिहाय प्रत्येक 50 घरांमध्ये एक स्वयंसेवक, शिक्षक याची नेमणूक करून आढळणाऱ्या व्यक्तीस लगेच तपासणी करण्याची व्यवस्था ४ ठिकाणी करण्यात आली होती.

सुमारे 43 हजार नागरिकांची तपासणी केल्यानंतर 147 नागरिकांमध्ये संशयित लक्षणे दिसली. त्यांची तपासणी केली असता 23 जण कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यांना पुढील उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे, असे मुख्याधिकारी रवी पवार यांनी सांगितले.

तपासणीसाठी लॉकडाऊन घोषित केल्यामुळे शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली लिंब फाटा, वडगाव फाटा, तळेगाव स्टेशन चौक येथे रस्ते सील करण्यात आले होते. तर मुख्य रस्त्यावर जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दोन दिवस तपासणी

‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ या मोहिमेत जे नागरिक तपासणी करण्याचे राहिले आहेत. यांची तपासणी 25 व 26 रोजी तळेगाव स्टेशन येथे संत ज्ञानेश्वर शाळा क्रमांक 6 व गाव भागामध्ये थोर समाजसेवक नथूभाऊ भेगडे पाटील शाळा येथे सकाळी 9 ते 5 या वेळेत होईल .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.