Pimpri News : स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास परवानगी; शाळा, महाविद्यालये मात्र पुढील आदेशापर्यंत बंद

 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र आणि क्लासेस सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांचे नियमित वर्ग पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आज (रविवारी दि. 1) दिले आहेत.

महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा नवीन प्रकार डेल्टा, डेल्टा प्लस हा काही जिल्ह्यांमध्ये आढळून आला आहे. त्याचा प्रसार होत आहे. पुढील चार ते सहा आठवड्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाने विविध उपाययोजना आणि निर्बंध लागू केले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी देखील याबाबत काही नवीन नियम जाहीर केले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र, क्लासेस हे सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी सात वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांचे नियमित वर्ग पुढील आदेशापर्यंत पूर्णतः बंद राहतील. मात्र ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील असे आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. त्याच बरोबर यापूर्वी सुरू असलेले निर्बंध देखील पुढील आदेशापर्यंत कायम राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.