Pimpri News: जैव वैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी ‘नॉन क्लोरोनेटेड’ बॅगा खरेदी करणार

एमपीसी न्यूज – कोरोना केअर सेंटर, महापालिका दवाखाने आणि रूग्णालयांमधील जैव वैद्यकीय कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी लाल आणि पिवळ्या रंगाच्या नॉन क्लोरोनेटेड बॅगा खरेदी करण्यात येणार आहेत. वेगवेगळ्या साईजच्या या बॅगा खरेदीसाठी 25 लाख 56 हजार रूपये खर्च होणार आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिकेला कोरोना केअर सेंटर आणि महापालिका दवाखाने, रूग्णालयास नॉन क्लोरोनेटेड बॅगांमध्ये लाल आणि पिवळ्या रंगातील बॅगा तातडीने उपलब्ध होण्यासाठी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनी मध्यवर्ती औषध भांडार यांच्याकडील 17 जुलै 2020 रोजीच्या पत्राद्वारे मागणी केली आहे.

या मागणीनुसार, पॉस्को एनव्हायरलमेंटल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांना या बॅगांचे दरपत्रक देण्याबाबत कळविले होते. त्यानुसार, त्यांनी 7 ऑक्टोबर रोजीच्या पत्राद्वारे दरपत्रक सादर केले आहे.

या बॅगा खरेदीसाठी महापालिका वैद्यकीय विभागाअंतर्गत रूग्णालयाचा घनकचरा गोळा करण्यासाठी नॉन क्लोरोनेटेड बॅगा खरेदीसाठी पॉस्को एनव्हायरलमेंटल सोल्युशन यांच्यासमवेत 28 फेब्रुवारी 2006 नुसार 15 वर्षाचा करारनामा झाला. त्यामुळे नॉन क्लोरोनेटेड बॅगा त्यांच्याकडून घेण्यात याव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत.

मध्यवर्ती भांडार विभागामार्फत 14 मार्च 2020 रोजीच्या निर्णयानुसार, पॉस्को एनव्हायरलमेंटल सोल्युशन यांना जैव वैद्यकीय संस्थांमधून निर्माण होणा-या जैव वैद्यकीय कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी 29 फेब्रुवारी 2020 पासून सहा महिने किंवा नवीन निविदा प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत तसेच नवीन प्रकल्प मोशी येथे उभारून पूर्ण क्षमतेने चालू होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पॉस्को एनव्हायरलमेंटल सोल्युशन यांनी 14 इंच बाय 15 इंच साईजच्या लाल रंगाच्या 3500 आणि पिवळ्या रंगाच्या 3500 नॉन क्लोरोनेटेड बॅगाकरिता 50 बॅगांच्या एका पाकीटासाठी प्रति पॅकेट 111 रूपये 50 पैसे दर आहे. त्यानुसार, लाल आणि पिवळ्या रंगाच्या सात हजार बॅगांची 140 पाकीटे खरेदी करण्यासाठी 15 हजार 610 रूपये खर्च होणार आहे.

19 इंच बाय 21 इंच साईजच्या लाल रंगाच्या 1450 आणि पिवळ्या रंगाच्या 1450 नॉन क्लोरोनेटेड बॅगाकरिता 50 बॅगांच्या एका पाकीटासाठी प्रति पॅकेट 245 रूपये 50 पैसे दर आहे. त्यानुसार, लाल आणि पिवळ्या रंगाच्या 2 हजार 900 बॅगांची 58 पाकीटे खरेदी करण्यासाठी 14 हजार 239 रूपये खर्च होणार आहे.

27 इंच बाय 30 इंच साईजच्या लाल रंगाच्या 20 हजार 900 आणि पिवळ्या रंगाच्या 1 लाख 12 हजार 150 नॉन क्लोरोनेटेड बॅगाकरिता 50 बॅगांच्या एका पाकीटासाठी प्रति पॅकेट 803 रूपये दर आहे.

त्यानुसार, लाल आणि पिवळ्या रंगाच्या 1 लाख 33 हजार 50 बॅगांची 2 हजार 661 पाकीटे खरेदी करण्यासाठी 21 लाख 36 हजार 783 रूपये खर्च होणार आहे. 18 टक्के जीएसटी धरून हा खर्च 25 लाख 56 हजार रूपये एवढा होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.