Pimpri news: पालिकेतर्फे बेघरांना निवा-याची ‘सावली’!

पिंपरीतील बेघर केंद्राचे शनिवारी महापौरांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज – जागतिक बेघर दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत पिंपरी भाजी मंडई येथे शहरातील बेघरांसाठी ‘सावली’ बेघर निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते उद्या (शनिवारी) उद्घाटन होणार आहे.

सकाळी 10 वाजता होणार्‍या या कार्यक्रमास उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेचे राजू मिसाळ, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह पदाधिकारी तसेच अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

शासन निर्णयानुसार राज्यातील 53 शहरांमध्ये दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

या अभियाना अंतर्गत शहरी बेघरांना निवारा व्यवस्था करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका परिक्षेत्रात नागरी बेघरांचे सर्वेक्षण करण्यासाठी शासनाकडून सर्वेक्षण संस्था नेमण्यात आली होती.

या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाअंती शहरात एकूण 154 बेघर आढळून आलेले आहेत. या बेघरांसाठी निवारा केंद्र महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात येणार आहे.

नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत पिंपरी भाजी मंडई येथील पहिल्या मजल्यावर हे केंद्र सुरू केले जाईल. शासनाने 10 ऑक्टोबर हा दिवस जागतिक बेघर दिन म्हणुन साजरा करण्याचे सूचित केले आहे.

या दिनानिमित्त पालिकेच्या वतीने सावली बेघर निवारा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. खासगी संस्थेमार्फत हे केंद्र चालविले जाणार आहे.

या केंद्रात एकूण 24 खोल्या असून यामध्ये 110 खाटांची व्यवस्था असणार आहे. तसेच याठिकाणी निवार्‍यासाठी येणार्‍या वृध्द, रुग्ण, दिव्यांग तसेच शून्य ते चौदा वयोगटातील मुली व मुले यांना मोफत चहा, नाष्टा आणि जेवण इत्यादी व्यवस्था करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.