Pimpri News: शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महापालिकेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

महापालिका मुख्य प्रशासकीय कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

उपमहापौर केशव घोळवे, आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, मुख्य उद्यान अधिक्षक प्रकाश गायकवाड, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, मुख्य लिपिक प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते प्रतिक पवार, विक्रांत पवार, युवराज दाखले, सचिन लिमकर, राहूल शिर्के, काका कुलकर्णी आदी उपस्थित होते.

महापौर ढोरे म्हणाल्या, शिवराय सर्वांसाठी प्रेरणा शक्ती आणि स्फूर्ती देणारे उर्जास्त्रोत आहेत. संकटांचे संधीत रुपांतर करुन त्यांनी शत्रूवर मात केली. त्यांचा प्रत्येकाने आदर्श घेतला पाहिजे. सध्या कोरोना महामारीचे सावट असून सर्वांनी मास्क परिधान करुन, गर्दी टाळून आणि सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असेही त्या म्हणाल्या.

भक्ती शक्ती चौक निगडी येथील कार्यक्रमास विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, अनुराधा गोरखे, नगरसदस्य अमित गावडे, शिवजयंती उत्सव समितीचे सागर तापकीर, जीवन बोऱ्हाडे, अभिषेक म्हस्के, नकुल भोईर, दादा पाटील, राजू पवार आदी उपस्थित होते.

दरम्यान, महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दोन दिवसाच्या ऑनलाईन विचार प्रबोधन पर्वात ख्यातनाम वक्ते शेखर पाटील यांनी “ शिवचरित्र आणि आजची युवा पिढी” या विषयावर व्याख्यान सादर केले. सुप्रसिद्ध शाहिर प्रसाद विभुते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला. त्यांनी त्यांच्या पोवाड्यातून प्रतापगडाचा पराक्रम, महाराजांची रणनिती, युद्धकौशल्य व राजनिती आणि प्रतापगडाचा पराक्रम सादर केला.

चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएसच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र अभ्यासून त्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आपापल्या आयुष्यातील ध्येयपूर्तीसाठी कटीबद्ध व्हावे, असे आवाहन व्याख्याते विनोद बाबर यांनी केले.

काळेवाडी येथील शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित तापकीर शाळेच्या वतीने संस्थेचे सचिव मल्हारी तापकीर यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. चंद्रकांत तापकीर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. शुभम पन्हाळे या विद्यार्थ्यांने पोवाडे सादर करून स्फूर्तीदायी वातावरण तयार केले. प्रगती जाधवर, शिवम येलुरे, पल्लवी कुद्रे, चैतन्य पाठक या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरक इतिहास मांडून उपस्थितांची वाहवा मिळविली. पायल कांबळे यांनी गीत सादर केले.

यावेळी एक मराठा लाख मराठा संस्थेचे युवराज दाखले, सचिन लिमकर, जेष्ठ नागरिक संघाचे पद्माकर जांभळे संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्या अश्विनी तापकीर, पुणे केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष विवेक तापकीर, रवींद्र बामगुडे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.