Pimpri news: एसटी महामंडळाच्या ‘स्मार्ट कार्डला’ प्रहार अपंग क्रांतीचा विरोध

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधील प्रवासासाठी दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या स्मार्ट कार्ड योजनेला अपंग संघटनांनी विरोध केला आहे. याबाबत प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे यांनी हा आदेश रद्द करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

प्रहार संघटनेचे राजेंद्र वाकचौरे म्हणाले, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये अपंग व्यक्तींना स्वतःसाठी 75 टक्के व सोबतीला 50 टक्के सवलत दिली जाते. आता या सवलतीचा लाभ घेण्यासाठी महाव्यवस्थापक वाहतूक यांनी आदेश काढून एसटी महामंडळाकडे अपंग व्यक्तींना स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी करताना युडीआयडी कार्ड, आधार कार्ड, आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल, घेऊन जावा लागणार आहे. या नोंदणीसाठी पन्नास रुपये भरून ही नोंदणी करावी लागणार आहे.

आयुक्त अपंग कल्याण महाराष्ट्र राज्य यांनी वेळोवेळी महाव्यवस्थापक वाहतूक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई यांना युडीआयडी ग्राह्य धरावे, असे आदेश दिले आहेत. अपंग व्यक्ती अधिनियम 2016 हा केंद्रात व राज्यात लागू झालेला आहे. केंद्र सरकारच्या वतीने युडीआयडी हे एकच ओळखपत्र सर्वत्र चालणार आहे असं जाहीर केले आहे. असे असतानाही एसटी महामंडळ मात्र स्वतःचे ओळखपत्र तयार करुन आणखी एका ओळख पत्राची भर पाडत आहे.

आधीच अपंगांकडे समाज कल्याण खात्याचे ओळख पत्र, रेल्वेचे ओळख पत्र, बसचे ओळख पत्र, आधार कार्ड, पँनकार्ड, मतदान ओळख पत्र, एटीएम कार्ड, असे अनेक कार्ड आहेत. आता एसटीच्या स्मार्ट कार्डची भर पडणार आहे. अपंगांनी फक्त ओळख पत्रच संभाळायचे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.