Pimpri News: सांस्कृतिक लोकशाहीचे पावित्र्य टिकले पाहिजे – श्रीपाल सबनीस

एमपीसी न्यूज – साहित्य आणि संस्कृती हे मानवाच्या विकासाचे विषय आहेत. राजकारण याला पूरक असायला हवे; मात्र सध्या तसे चित्र दिसत नाही. राजकीय लोकशाही टिकवायची असेल. तर, सांस्कृतिक लोकशाहीचे पावित्र्य टिकले पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. पिंपरी येथे आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर ‘संमेलनाचे सामाजिकदृष्ट्या महत्व’ या विषयावर चर्चासत्र पिंपरी येथे पार पडले. महापौर उषा ढोरे, साहित्यिक श्रीकांत चौगुले उपस्थित होते.

काही कार्यकर्ते आहेत जे कविता किंवा इतर साहित्यिक लिखाण करत नाहीत; मात्र नियोजनात पुढाकार घेतात. संस्कृतीक लोकशाहीची पालखी या सामान्य माणसाच्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर असल्याने जिवंत आहे. रसिकांची रसिकता कार्यकर्त्यांचा सेवाभाव या सर्वांसाठी आवश्यक आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी सर्वदूर पसरली जाते असे सबनीस म्हणाले.

येत्या पिढीवर सांस्कृतिक संस्कार व्हावे यासाठी काय सांगाल असे विचारले असता सबनीस म्हणाले की, कोणतेही सरकार सत्तानीष्ठच असते. त्यामुळे अशा कोणत्याही पक्षाच्या सरकारकडून अपेक्षा करणे चुकीचे आहे. सध्या वैचारिक भ्रष्टता हा समाजाचा स्थायीभाव बनतोय असे चित्र असून ही धोक्याची घंटा आहे. यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यायला हवा, जनता सुज्ञ व्हायला हवी. त्यासाठी संविधानाचा अभ्यास सर्वांनी करायला हवा. येत्या काळात स्पष्टपणे आपले मत मांडणा-या साहित्यिकांची समाजाला मोठी गरज आहे. सध्या अशा साहित्यिकांची कमतरता भासते आहे. साहित्यिकांनी येत्या काळात समाजाला दिशा द्यायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.