Pimpri corona News: जम्बो कोविड सेंटर सोमवारपासून सुरु होणार; महापौरांसह पक्षनेत्यांनी घेतला आढावा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने बेडची कमतरता भासू नये यासाठी अण्णासाहेब मगर स्टेडीयमच्या जागेवरील जम्बो कोविड सेंटर सोमवारपासून सुरू करण्याचे नियोजन आहे. महापौर उषा ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी जम्बो सेंटरला भेट देऊन कामाची पाहणी केली. तसेच अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

रुग्णालय व्यवस्थापनासोबत चर्चा करून कामाचा आढावा घेतला. रुग्णालयातील संबंधित कामे त्वरित पूर्ण करुन सेंटर कार्यान्वित करण्याच्या सूचना केल्या. शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांना ऑक्सिजन, आयसीयू बेडची आवश्यकता भासणार असून जम्बो कोविड सेंटरमधील 200 बेड सोमवारपासून कार्यान्वित करण्याचे वैद्यकीय विभागाचे नियोजन आहे.

पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील कोरोना रुग्णांवर उपचार होण्यासाठी जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले होते. या रुग्णालयावर नियंत्रणासाठी महापालिकेचे डॉक्टर व अधिकारी उपलब्ध करुन देत कोरोना आटोक्यात आणण्यात यश आले. परंतु, गेल्या महिन्याभरात कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.

शहरातील रुग्णांना त्वरित ऑक्सिजन, आयसीयू बेड उपलब्ध होण्यासाठी जम्बो रुग्णालय पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याचा महापौर ढोरे व पक्षनेते ढाके यांनी आढावा घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.