Pimpri news: पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सायकलचा वापर करा – महापौर ढोरे

एमपीसी न्यूज – पर्यावरणाचा समतोल आणि आरोग्य राखण्यासाठी शहरातील नागरिकांनी सायकलचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या( MoHUA ) ‘इंडिया सायकल्स 4 चेंज’ या उपक्रमांतर्गत सायक्लोथॉन व वॉकेथॉन कार्यक्रमाचे उद्घाटन
महापौर ढोरे यांचे हस्ते करण्यात आले. ‍त्यावेळी त्या बोलत होत्या.

या प्रसंगी उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, सतिश इंगळे, बापु गायकवाड आणि विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आयुक्त श्रावण हर्डीकर, म्हणाले कोविड 19 च्या पार्श्वभुमीवर शहरात सर्व वाहतूक व्यवस्था लॉकडाऊनमुळे बंद पडली आणि अनलॉकच्या पार्श्वभुमीवर सायकलींग व पायी चालणे या व्यवस्थेला सर्वत्र महत्व प्राप्त होत आहे. प्रत्येक रस्त्यावर सायकल पथ व पदपथ यांची निर्मिती करणे हे ध्येय प्रत्येक शहरासाठी ठेवण्यात येत आहे.

त्यानुसार आपली महानगरपालिका देखील इंडिया सायकल फॉर चेंज या उपक्रमांतर्गत संपुर्ण शहरात सायकलीस्टसाठी सुरळीत असे वातावरण आणि रस्ते निर्माण करण्याचे ध्येय ठेवत आहे. नागरिकांनी दररोज कराव्या लागणा-या नजीकच्या प्रवासासाठी सायकल चालवायचा निर्धार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त करावा, असे आवाहन आयुक्तांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.