Pimpri News: ‘स्थायी’ची शेवटची सभा रात्री उशिरापर्यंत, ठेकेदारांची वर्दळ अन् पोलिसांचा बंदोबस्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे यांचा कार्यकाळ 28 फेब्रुवारीला संपुष्टात येत आहे. त्यांच्या कार्यकाळातील शेवटची सभा आज (शुक्रवारी) रात्री उशिरापर्यंत सुरु होती. सभागृहाबाहेर ठेकेदारांची वर्दळ होती. तर, पोलीस बंदोबस्त देखील तैनात होता.

महापालिकेतील स्थायी समिती ही अत्यंत महत्वाची समिती आहे. या समितीच्या माध्यमातून सर्व आर्थिक बाबींचे निर्णय घेतले जातात. शहरातील विकासकामांना स्थायी समिती मान्यता देते. विकासकामांना मान्यता दिल्यानंतर स्थायी समिती अध्यक्षांसह सदस्यांना ‘एम व्हिट्यामीन’ मिळते हे उघड गुपित आहे.

पालिकेचा कारभार हाकणा-या या समितीची सदस्य संख्या 16 असून भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेना 1 आणि अपक्षांचा 1 नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत.

स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे यांच्या कार्यकाळातील आजची अखेरची सभा आहे. नेहमी दर बुधवारी होणारी साप्ताहिक सभा आज शुक्रवारी ठेवली आहे. तसेच प्रत्येकवेळी दुपारी दोन वाजता होणारी सभा आज सायंकाळी पाच वाजता सुरु झाली.

शेवटची सभा असल्याने अनेक विषय स्थायी समिती समोर आणण्यासाठी स्थायी समिती अध्यक्षांची धावपळ सुरु होती. अखेरची सभा असल्याने काही गोंधळ होवू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात होता. स्थायी समिती सभागृहाबाहेर ठेकेदारांची मोठी वर्दळ होती.

पाच वाजता सुरु झालेली सभा रात्री सव्वा आठ वाजेपर्यंत सुरु होती. दरम्यान, दरवेळी स्थायी समितीची शेवटची सभा रात्री उशिरापर्यंत घेतली जाते. कारण, कोट्यवधी रुपयांच्या विषयांना मान्यता दिल्यानंतर ‘एम व्हिट्यामीन’ मिळते, हे उघड गुपित आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.