Pimpri News: भाजप संघटनेतील पदाधिकारी, स्वीकृत नगरसेवकाची सभागृहनेत्यांशी हुज्जत?

एमपीसी न्यूज – वाकडच्या रस्ते विकास विषयावर राज्य सरकारला अभिवेदन करण्याचा पत्रव्यवहार अयोग्य असल्याचा कांगावा करत भाजपच्या संघटनेतील एक पदाधिकारी आणि स्वीकृत नगरसेवकाने सभागृहनेत्यांशी चांगलीच हुज्जत घातली.

हा प्रकार आज (बुधवारी) सायंकाळी चारच्या सुमारास पालिका मुख्यालयात घडला. या घटनेला उपस्थितांनी दुजोरा दिला आहे. वास्तविक स्थायी समिती अध्यक्ष यांच्या संबंधित विषय असताना सभागृहनेत्यांवर खापर फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

शिवसेना गटनेते राहुल कलाटे प्रतिनिधित्व करत असलेल्या वाकड प्रभागामधील ताथवडेतील जीवननगरकडून मुंबई – बेंगलोरकडे जाणारा रस्ता विकसीत करण्याचा (20 कोटी 33 लाख रुपये) आणि प्रभाग क्रमांक 25 मध्ये काँक्रीटीकरण करणे (30 कोटी 69) असे 51 कोटी रुपयांचे दोन प्रस्ताव स्थायी समितीने नुकतेच फेटाळले आहेत. त्या विरोधात शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी राज्याच्या नगरविकास खात्याकडे दाद मागितली आहे. त्यावर नगरविकास खात्याने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा अभिप्राय मागविला. आयुक्तांनी रस्ते विकासाच्या बाजूने सकारात्मक अभिप्राय दिला.

तथापि, कोणतेही कारण न देता स्थायी समितीमध्ये वाकडचे रस्ते विकासाचे प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आले. स्थायी समितीने फेटाळलेले दोनही प्रस्ताव मंजूूर करण्याचे आदेश राज्य सरकारने महापालिका आयुक्तांना दिले. स्थायी समितीने फेटाळलेले रस्ते विकासाचे प्रस्ताव विखंडित करण्याच्या अनुषंगाने पहिल्यांदा निलंबीत करण्यात आले. याबाबत अभिवेदन करावयाचे असल्यास 30 दिवसांच्या आत राज्य सरकारकडे सादर करावे. या कालावधीत अभिवेदन प्राप्त न झाल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

लेखी अभिवेदन करण्याची जबाबदारी स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे यांच्यावर सोपविण्यात आली. त्यांनी भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या वादात न पडता समतोलपणे पत्र तयार केले. त्यामुळे भाजप आमदाराचा संताप झाला. अध्यक्ष लोंढे हे भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचे समर्थक असल्याने त्यांना बोलण्याचे धाडस केले नाही.

सर्व राग सभागृहनेते नामदेव ढाके यांच्यावर काढण्याचे ठरले. भाजपचा एक माजी नगरसेवक, संघटनेतील पदाधिकारी आणि स्वीकृत नगरसेवकाला सभागृहनेत्याच्या अंगावर सोडण्यात आले.

या दोघांनी सायंकाळी सभागृहनेत्याला त्यांच्याच दालनात जाब विचारला. आयुक्त तुमचे ऐकत नसतील तर राजीनामा द्या आणि घरी बसा. पक्षाची बदनामी होत असून तुम्ही अकार्यक्षम आहात, असे सुनावण्यात आले.

हा वाद विकोपाला जात असल्याचे लक्षात येताच स्थायी समितीच्या माजी अध्यक्षाने मध्यस्थी करत वादावर पडदा टाकला. याबाबत विचारले असता ‘असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे’ सभगृहनेते नामदेव ढाके यांनी सांगितले. स्वीकृत नगरसेवक मोरेश्वर शेंडगे म्हणाले, ‘असे काही झाले नाही. आम्ही गप्पा मारत बसलो होतो’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.