Pimpri: विनापरवाना गैरहजर राहणाऱ्या वैद्यकीय अधिका-याची वेतनवाढ स्थगित

एमपीसी न्यूज – विनापरवाना 540 दिवसांची गैरहजेरी पिंपरी महापालिकेच्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याला महागात पडली आहे. या अधिकाऱ्याची एक वेतनवाढ स्थगित करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कारवाई केली आहे.

डॉ. स्वरुप आप्पासाहेब गायकवाड असे या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. गायकवाड हे महापालिकेच्या वैद्यकीय विभागात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अत्यावश्‍यक सेवेतील महत्त्वाच्या गट “ब’ दर्जाचे हे पद आहे. डॉ. गायकवाड यांच्याकडे महापालिकेच्या चिंचवड येथील तालेरा रुग्णालयाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. रुग्णालयीन सेवा ही अत्यावश्‍यक सेवा असून प्रत्येक कर्मचारी रुग्णालयीन सेवेशी व कर्तव्याशी बांधील असतात. डॉ. गायकवाड यांनी अध्ययन रजेची मागणी केली होती.

दीर्घ रजा असल्यामुळे ती मान्य करता येणार नाही, असे महापालिका प्रशासनाने कळविले होते. तरीही तब्बल 540 दिवस विनापरवाना गैरहजेरी लावली. त्यांच्या या कृतीमुळे रुग्ण सेवेत अडथळा आल्याने त्यांची खातेनिहाय चौकशीचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार, डॉ. गायकवाड यांची खातेनिहाय चौकशी पूर्ण झाली असून अहवाल प्राप्त झाला आहे. तसेच त्यांच्यावरील दोषारोप अंशतः सिद्ध झाले आहेत. त्यांनी कोणतीही सवलत न घेता दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम स्वखर्चाने पूर्ण केला आहे.

त्याचा उपयोग महापालिका क्षेत्रातील रुग्णांना होईल, असा दावा करीत कारवाई सौम्य करण्याची याचना डॉ. गायकवाड यांनी केली होती. मात्र, डॉ. गायकवाड यांनी सादर केलेले अभिवेदन संयुक्तिक वाटत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. डॉ. गायकवाड यांनी सेवा कायद्याचा भंग केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट झाले. त्यामुळे गैरहजर कालावधी विनावेतन करावा तसेच एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश आयुक्त हर्डीकर यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.