Pimpri: पुण्यापाठोपाठ पिंपरी महापालिकेचीही थुंकीबहाद्दरांवर दंडात्मक कारवाई

रस्त्यावर थुंकल्यास 150 रुपये दंड; नऊ जणांकडून केला हजार रुपये दंड वसूल

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेपाठोपाठ आता पिंपरी-चिंचवड महापालिकेने देखील सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांवर धडक कारवाईला सुरुवात केली आहे. अस्वच्छता पसरविणा-यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या 9 जणांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून एक हजार 350 रुपये दंड वसूल केला आहे. याबाबतची माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

सरकारने घनकचरा व्यवस्थापन नियम आणि 2016 च्या तरतुदीचे पालन न करणा-या व्यक्ती अथवा संस्थाना दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार महापालिकांना प्रदान केले आहेत. त्यानुसार पिंपरी महापालिकेकडून रस्त्यावर थुंकल्यास, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणा-यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. रस्त्यांवर थुंकल्याल 150 रुपये, उघड्यावर लघुशंका केल्यास 200 रुपये दंड आकारण्यात येत आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यावर कारवाईची मागणी लोकांतून होत होती. आता महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे, कचरा टाकणारे, उघड्यावर लघुशंका करणा-यांवर धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या 15 दिवसात सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या 9 जणांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून एक हजार 350 रुपये दंड वसूल केला आहे. तर, रस्त्यावर कचरा टाकणा-या 24 जणांकडून चार हजार 320 रुपये दंड वसूल केला आहे. ही कारवाई अधिक तीव्र केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त गावडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.