Pimpri: विविध मागण्यांसाठी बीएसएनएल कर्मचा-यांचा संप

एमपीसी न्यूज – बीएसएनएलला फोर-जी स्पेक्ट्रम सुविधा पुरवावी, बीएसएनएलच्या जागा त्वरीत नावावर कराव्यात, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बीएसएनएलला सरकारने मदत करावी. कर्मचा-यांचा वेतन करार लवकर करण्यात यावा, आदी विविध मागण्यांसाठी बीएसएनएलच्या कर्मचा-यांनी तीन दिवसांचा संप पुकारला आहे. सोमवार (दि.18) पासून सुरू कर्मचा-यांचा संप सुरु असून या संपाला कर्मचा-यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे.

देशभरातील सगळ्या खाजगी टेलिकॉम कंपन्यांकडे फोर-जी सेवा आहे. बीएसएनएल ही केंद्र सरकारच्या मालकीची कंपनी असताना हे सरकार बीएसएनएलला फोर-जी सेवा देत नाही. त्यामुळे बीएसएनएलची पीछेहाट होत आहे. बीएसएनएलच्या हिंदूस्थानभरातील जागा 19 वर्षांपासून बीएसएनएलच्या नावावर आजतागायत केलेल्या नाहीत. बीएसएनएलवरचा ग्राहकांचा विश्वास उडावा, यासाठी बीएसएनएल बंद होणार, अशा प्रकारच्या वावड्या उठविल्या जात आहेत. जानेवारी 2017 पासूनचा कर्मचा-यांचा वेतन करार द्यायलाही केंद्र सरकार टाळाटाळ करत आहे.

  • बीएसएनएल कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी सन 2018 मध्ये 24 फेब्रुवारी व 3 डिसेंबर रोजी केंद्रीय दूरसंचारमंत्री मनोज सिंह यांना निवेदन दिले होते. मात्र, बीएसएनएल कर्मचा-यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. त्यामुळे कर्मचा-यांनी आता संपाचे हत्यार उपसले आहे. सोमवारपासून सुरु झालेल्या या संपात बीएसएनएल एम्प्लाईज युनियन, महाराष्ट्रचे अध्यक्ष संदीप गुळूजकर, संभाजी मस्तूद, ज्ञानेश्वर नखाते, सुरेश तावरे, दत्ता करहे, अविनाश कांबळे आदी सहभागी झाले आहेत.

‘या’ आहेत मागण्या :
# दहा टक्के फिटमेंटसह तिसरा वेतन करार द्यावा.
# बीएसएनएल व्यवस्थापनाने दिलेल्या प्रस्तावानुसार फोर जी स्पेक्ट्रम सेवा द्यावी.
# 1 जानेवारी 2017 पासून सेवानिवृत्त कर्मचा-यांना पेंशन द्या
# सरकारी नियमानुसार बीएसएनएलकडून पेंशन कॉन्ट्रिब्यूशन घ्यावे.
# दुस-या वेतन करारातील त्रुटी दूर कराव्यात.
# बीएसएनएलच्या स्थापनेवेळी घेतलेल्या निर्णयानुसार बीएसएनएलच्या जागा व संपत्ती त्वरीत नावे कराव्यात.
# ग्रुप ऑफ मिनिस्टर्सद्वारा निर्णयानुसार बीएसएनएलची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत करावी.
# बीएसएनएलला बँकाकडून कर्ज घेण्यासाठी ‘लेटर ऑफ कम्फर्ट’ देण्यात यावे.
# बीएसएनएलचे मोबाइल टॉवर्स आउट सोर्सिंगच्याद्वारे देखभाल करण्याचा प्रस्ताव रद्द करा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.