Pimpri: ढासळलेल्या कायदा-सुव्यस्थेवर पदाधिकारी आणि पोलिसांची बंद दाराआड चर्चा

महासभेत कंठशोष करणा-यांचे पोलीस आयुक्तांशी गुफ्तगु; चर्चेतील तपशील गुलदस्त्यात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असताना ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेवर महापालिकेतील पदाधिकारी आणि पोलिसांनी आज (बुधवारी)बंद दाराआड चर्चा केली. त्यामुळे चर्चेतील नेमका तपशील गुलदस्त्याच राहिला. महासभेत कंठशोष करणा-यांनी पोलिसांशी ‘इनडोअर’ नेमकी काय चर्चा केली ? खरंच ते शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शहरातील ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी चिंचवड अॅटो क्लस्टर येथे महापालिकेतील पदाधिकारी आणि पोलिसांची बैठक सुरु आहे. या बैठकीला महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यासह मोजके नगरसेवक आणि पोलीस उपस्थित होते. ही बैठक अॅटो क्लस्टरच्या सभागृहात घेतली जाणार होती. सर्व नगरसेवक बैठकीला हजर असणार होते. त्याचे पत्रकारांना निमंत्रण देखील देण्यात आले होते. तथापि, ही बैठक बंद दाराआड घेण्यात आली. बैठकीनंतर पत्रकारांना माहिती दिली जाईल, असे पदाधिकारी आणि पोलिसांनी सांगितले. त्यामुळे पदाधिकारी खरंच बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर आहेत का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी 15 ऑगस्ट 2018 पासून स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु झाले. परंतु, पोलीस आयुक्तालय होऊनही गुन्हेगारी नियंत्रणात आली नाही. अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, अत्याचार, खून, मारामा-या, विवाहित महिलांचे मंगळसूत्र हिसकाविणे, दिवसा-ढवळ्या तोडफोड अशा घटनांनी शहर हादरुन गेले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरवासिय भयभीत झाले आहेत. याचे पडसाद महापालिकेच्या सभेत देखील उमटले होते. नगरसेवकांनी पोलिसांच्या कामकाजावर आक्षेप घेत हल्ला चढविला होता.

त्यानंतर महापौर राहुल जाधव यांनी यामध्ये पुढाकर घेतला. त्यांनी पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याबरोबर पत्रव्यवहार करुन बैठक बोलावली. पोलिसांनी वेळ नसल्याचे कारण देत सोमवारी होणारी बैठक लांबणीवर टाकली ती बैठक आज सुरु आहे. अॅटो क्लस्टरच्या सभागृहात सर्व आमदार, गटनेते, नगरसेवक अशी बैठक घेतली जाणार होती. त्याचे पत्रकारांना निमंत्रण देखील देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र बंद दाराआड बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर माहिती दिली जाईल, असा पवित्रा पदाधिका-यांनी घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.