Pimpri : ‘खासगी शिक्षण संस्थांनी शिक्षण शुल्कात 50 % कपात करावी’

चिखली, मोशी, चऱ्होली हौसिंग सोसायटी फेडेरेशनची मागणी

एमपीसी न्यूज – देशामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात थैमान घालत असताना दुसरीकडे शालेय शिक्षण संस्था पालकांकडे शुल्क वसुलीसाठी तगादा लावत आहेत.  त्यामुळे सर्व  शाळांनी फी वसुलीसाठी कोणत्याही पालकांना तगादा लावू नये व ह्यावर्षीच्या शैक्षणिक शुल्कामध्ये 50% सूट मिळावी, अशी मागणी  चिखली, मोशी, चऱ्होली हौसिंग सोसायटी फेडेरेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत फेडेरेशनच्या वतीने सचिव  संजीवन सांगळे,  कोअर कमिटी सदस्य दिगंबर काशिद यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन पाठविले आहे.

 त्यात म्हटले आहे की,  शाळा बंद असल्यामुळे   काही शाळांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारात कापत केली तर काहींनी पगार बंद केले. यामुळे शालेय संस्थांचे 70% खर्चात कपात झाली आहे, त्याचा निश्चित फायदा पालकांना व्हायला हवा अशी भूमिका मांडण्यात आली आहे.

तसेच ज्या शिक्षण संस्था आॅनलाईन शिक्षण देत आहेत ते फक्त पाठ पाठवतात किंवा व्हीडीओ शेअर करतात, हे सर्व मटेरियल एज्युकेशन वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात अगदी निःशुल्क उपलबध आहे व प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शाळे मार्फत जे मटेरियल पाठवले जाते त्याचा अभ्यास पालकांनाच पाल्याकडून करून घ्यावा लागतो.  त्यामुळे शैक्षणिक संस्था कोणत्या गोष्टींसाठी शुल्क आकारत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, ज्या शैक्षणिक संस्था पूर्ण बंद आहेत त्यांनी कोणतीही फी आकारू नये व‌ ज्या शैक्षणिक संस्था ऑनलाईन शिक्षण देत आहे त्यांनी 50% वार्षिक शिक्षण शुल्क आकारावे, अशी विनंती फेडरेशन तर्फ करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.